अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लावून दिला विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 07:28 PM2017-08-02T19:28:34+5:302017-08-02T19:30:57+5:30
लातूर शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचा सांगली जिल्ह्यातील तासगावातील मुलाशी विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
राजकुमार जोंधळे
लातूर, दि. 2 : शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचा सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात सावर्डे येथील एका मुलाशी विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात दहा जणांचे रॅकेट असून, त्यांनी यापूर्वीही अल्पवयीन मुलींचा विवाह लावून दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पूनम शहाणे हिच्यासह दहा जणांना अटक करण्यात आली असून, अन्य काहींचा शोध सुरु आहे.या प्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिनाभरापूर्वी शहरातील एक ११ वर्षीय मुलगी शाळेतून दुपारीच हरवल्याची तक्रार तिच्या आईने पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, मुलीच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला मात्र, ती आढळून आली नाही. आईने एका महिलेवर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेत चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्या महिलेने वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून हा प्रकार केल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. या रॅकेटमधील एकूण दहा जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान, पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पुनम शहाणे व अन्य नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास कामासाठी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे उघड केली नाहीत.
वधू-वर सूचक मंडळातून चालायचे रॅकेट...
लातूर शहरातील झिंगणप्पा गल्लीत राहणा-या एका महिलेने वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून हा विवाह घडवून आणल्याचे पुढे आले आहे.विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये एका राजकीय पक्षाची जबाबदार कार्यकर्ती सहभागी असून, तिच्या नावावर वधू-वर सूचक मंडळ आहे. या वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यातून त्यांनी असे विवाह लावले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अन्य आरोपींचा शोध सुरु...
अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन विवाह लावणा-या रॅकेटमधील अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून मुलाच्या कुटुंबियांशी बोलाचाली करायची आणि शहरातील एखाद्या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून न्यायाचे...हा उद्योग या आरोपींकडून सुरु होता. यात दहा जणांना अटक केली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी सांगितले.
गायब मुलींचा शोध सुरु...
लातूर शहरातून गेल्या वर्षभरात गायब झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध पोलीस प्रशासनाने सुरु केला आहे. कथित वधू-वर सूचक मंडळाच्या नावाखाली सुरु करण्यात आलेल्या गोरखधंद्याचा पर्दाफाश केल्यानंतर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गायब झालेल्या मुलींची माहिती घेतली जात असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहे. या वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून किती मुलींची फसवणूक करण्यात आली याचाही शोध सुरु आहे. अशी माहिती, लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे यांनी दिली.
विक्रीचा संशय..?
कथित वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना वेगवेगळे आमिष दाखवून फसवणे, त्यांचा इतरत्र विवाह लावून देणे, असा प्रकार या मंडळाच्या मोहक्यांकडून झाल्याचे पुढे आले आहे. लातूर शहरातील गायब मुलींची राज्यासह परराज्यात विक्री करण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
विशेष तपास पथकाची नियुक्ती
लातुरातील अल्पवयीन मुलींना वेगवेगळी आमिषं दाखवून त्यांचे अपहरण करुन, विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी चौकशी उपाधीक्षक शिलवंत ढवळे हे करणार आहेत. त्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिली.