विवाह नोंदणीच्या नोटिसा आॅनलाइन
By admin | Published: June 13, 2017 12:54 AM2017-06-13T00:54:44+5:302017-06-13T00:54:44+5:30
विवाह नोंदणी कार्यालयाला पडलेला एजंटांचा विळखा आणि होणारी गर्दी यावर तोडगा काढण्यासाठी यापुढे विवाह नोंदणीच्या नोटिसा आॅनलाइन पाठविण्याची सुविधा सुरू
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विवाह नोंदणी कार्यालयाला पडलेला एजंटांचा विळखा आणि होणारी गर्दी यावर तोडगा काढण्यासाठी यापुढे विवाह नोंदणीच्या नोटिसा आॅनलाइन पाठविण्याची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक अनिल कवडे यांनी दिली. ‘लोकमत’ने विवाह नोंदणी कार्यालयाबाहेर एजंटांनी थाटलेल्या फिरत्या दुकानांचे स्टिंंग आॅपरेशन करून वस्तुस्थिती मांडली होती. या बातमीची गंभीर दखल कवडे यांनी घेतली असून, कारवाईचे संकेत दिले आहेत.
कोर्ट मॅरेज करण्यासाठी येणाऱ्यांना आधी विवाह नोंदणीची नोटीस द्यावी लागते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. या कामासाठी एजंट अव्वाच्यासव्वा शुल्क वसूल करतात. विवाह नोंदणी कार्यालयामध्ये विशेष विवाह, पारसी विवाह आणि परराज्यातील नागरिकांच्या विवाहांची नोंदणी केली जाते. वर्षाला साधारणपणे दोन ते अडीच हजार विवाहांची नोंदणी या ठिकाणी होत असते. या ठिकाणी एजंटांमार्फत विवाह नोंदणीची कामे केली जात असल्यामुळे नागरिकांना नाहक अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात. विवाह नोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी असलेला एजंटांचा संपर्क, कार्यालयातील त्यांचा अनिर्बंध वावर या बाबी ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर या वृत्ताची गंभीर दखल घेण्यात आली.
विवाह नोंदणीच्या नोटिसा आॅनलाइन पद्धतीने पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे एजंटगिरीलाही आळा बसणार आहे. नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी आगामी काळात भर देण्यात येईल, असेही कवडे यांनी सांगितले.