आईच्या खुन्याला विवाहित तरुणीने यमसदनी धाडले
By admin | Published: November 3, 2016 08:48 PM2016-11-03T20:48:19+5:302016-11-03T20:48:19+5:30
घरा शेजारील बाभळीच्या झाडाच्या वादातून महिलेचा खून झाला. या खुनाचे प्रकरण मागे घ्यावे म्हणून आरोपीचा दबाव होता. अखेर हा दबाव झुगारत या वृद्धेच्या
ऑनलाइन लोकमत
सोनखास, दि. 03 - घरा शेजारील बाभळीच्या झाडाच्या वादातून महिलेचा खून झाला. या खुनाचे प्रकरण मागे घ्यावे म्हणून आरोपीचा दबाव होता. अखेर हा दबाव झुगारत या वृद्धेच्या विवाहित मुलीने त्या खुनातील आरोपीला यमसदनी धाडले. ही घटना यवतमाळ-दारव्हा रोडवरील तिवसा गावात बुधवारी सायंकाळी घडली.
लाडखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. बाळू थावरू चव्हाण (२३) रा.तिवसा ता.यवतमाळ असे मृताचे नाव आहे. पाच महिन्यांपूर्वी तिवसा येथे बाभळीच्या झाडावरून बाळूचा शेजारी राहणाऱ्या उर्मिला यशवंत धवने (५०) या महिलेसोबत वाद झाला. या वादात मारहाणीत उर्मिला ठार झाली. या प्रकरणी बाळू चव्हाणविरुद्ध लाडखेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान, तो जामिनावर सुटून आला. त्यानंतर खुनाचे प्रकरण मागे घ्यावे म्हणून उर्मिलाची मुलगी रंजना सीताराम राठोड (३०) रा.तिवसा हिच्यावर दबाव आणत होता. या दबावातूनच गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये खटके उडत होते. बुधवारी सायंकाळी पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यवसान मात्र रक्तरंजीत भांडणात झाले. रागाच्या भरात रंजनाने काठीने बाळूला जबर मारहाण केली. काठीचा घाव बाळूच्या वर्मी बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला यवतमाळ व नंतर नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बुधवारी लाडखेड पोलिसांनी रंजनाविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी बाळूचा मृत्यू झाल्याने तिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ठाणेदार नरेश रणधीर, फौजदार रवी वावळे, जमादार गजानन शेजूळकर तपास करीत आहे.