विवाहितेला साडीचा आग्रह का? हायकोर्टाचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2016 10:48 PM2016-10-16T22:48:46+5:302016-10-16T22:48:46+5:30
आपण एकविसाच्या शतकात जगत असून या काळात विवाहितेने साडी नेसण्याची अपेक्षा करणे कालबाह्य विचारांचे लक्षण आहे असे महत्त्वपूर्ण मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने
Next
id="yui_3_16_0_ym19_1_1476625571181_46951">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 16 : आपण एकविसाच्या शतकात जगत असून या काळात विवाहितेने साडी नेसण्याची अपेक्षा करणे कालबाह्य विचारांचे लक्षण आहे असे महत्त्वपूर्ण मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे.
उमेश व जयश्री असे प्रकरणातील पती-पत्नीचे नाव आहे. जयश्रीने नेहमी साडी नेसावी अशी उमेशची अपेक्षा आहे. जयश्रीने पंजाबी ड्रेस घालणे त्याला आवडत नाही. जयश्री पदवीचे शिक्षण घेत असून उमेश बँकेत नोकरीवर आहे. अशा परिस्थितीत पत्नीने साडी नेसण्याची अपेक्षा करणे योग्य नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी पतीने अशा अनावश्यक अपेक्षा टाळल्या पाहिजे अशी समज दिली आहे.
उमेश व जयश्रीचे ८ मे २०११ रोजी लग्न झाले. उमेश नाशिक जिल्ह्यात अॅक्सीस बँकेत नोकरी करीत आहे. उमेशने जयश्रीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. १८ मे २०१५ रोजी कुटुंब न्यायालयाने याचिका मंजूर केली. या निर्णयाविरुद्ध जयश्रीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व इंदिरा जैन यांनी वरील मुद्यासह अन्य विविध बाबींवर स्पष्ट निरीक्षण नोंदवून जयश्रीचे अपील मंजूर केले व कुटुंब न्यायालयाचा वादग्रस्त आदेश रद्द केला.
उमेशने जयश्रीवर विविध गंभीर आरोप केले होते. जयश्रीचे वागणे चांगले नाही. ती संयुक्त कुटुंबात राहायला तयार नाही. ती क्षुल्लक कारणांवरून सासरच्या मंडळीचा अपमान करते. घरचे काम करीत नाही. माहेरच्या सदस्यांसोबत फोनवर बोलत राहते. ती शारीरिक संबंध ठेवण्यास तयार नसते. साडी नेसत नाही असे उमेशचे म्हणणे होते. जयश्रीने सर्व आरोप फेटाळून उमेशसोबत राहण्याची तयारी दर्शविली होती. उमेश जयश्रीला सासरी ठेवून ४५० किलोमीटर लांब नोकरी करतो. पतीच्या अनुपस्थितीत कोणतीही पत्नी सासरी राहण्यास तयार होणार नाही असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. उमेशच्या पर्समध्ये दुसºया महिलेचा पासपोर्ट फोटो सापडला होता. यावरून जयश्रीने भांडण केले होते. जयश्री घर सोडून गेली होती. संबंधित महिलेचा फोटो विम्याच्या कागदपत्रावरील असल्याचे स्पष्टीकरण उमेशने दिले होते. परंतु, त्याला स्वत:कडे बँकेच्या विमा विभागाचे काम असल्याचे पुरावे सादर करता आले नाहीत.