डॉक्टरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:25 AM2017-07-18T01:25:03+5:302017-07-18T01:25:03+5:30
होमिओपॅथीचे शिक्षण घेत असलेल्या विवाहितेने विषारी औषध प्राशन करुन राहत्या घरी आत्महत्या केली. सोलापूरातील एका डॉक्टराच्या त्रासाला
- लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर (जि. सोलापूर) : होमिओपॅथीचे शिक्षण घेत असलेल्या विवाहितेने विष प्राशन करुन राहत्या घरी आत्महत्या केली. सोलापूरातील एका डॉक्टराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे, तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. पोलिसांनी डॉ. वीरेशकुमार जालादी याच्यासह पती, सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पूजा बापू पाखरे (२५)असे मृत महिलेचे नाव आहे़ ती सोलापूरच्या गांधीनाथा होमिओपॅथी या वैद्यकीय महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होती. तिला डॉ. जालादी हा वारंवार त्रास देत होता. याबाबत तिचे वडील पोपट दादा पवार व पती बापू ज्ञानदेव पाखरे हे त्यांच्या कुटुंबासह सोलापूर येथे डॉ. जालादी याला समजावून सांगण्यासाठी रविवारी गेले. त्याठिकाणी त्यांच्यात तू-तू मै-मै झाले. पुन्हा पाखरे व पवार कुटुंब पंढरपूर येथे आले. पूजा तिच्या पतीसह घरी गेली. त्यानंतर तिने किटक नाशक प्राशन केले. खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पूजा आणि बापू पाखरे यांना साडेचार वर्षांची नावाची मुलगी आहे़ पोपट पवार यांनी पूजाला तिचे पती बापू पाखरे व सासू हे चारित्र्याचा संशय घेऊन वारंवार मारहाण, शिवीगाळ, दमदाटी व जिवे मारण्याची धमकी देत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांंनी त्या दोघांवरही गुन्हा दाखल केला.
सॉरी फॉर माय डॉटर... वीरेशकुमार जालादीमुळे मी आत्महत्या करीत आहे. तो मला त्रास देतो. फोन करतो. धमकी देतो. कॉलेजमध्ये बळजबरीने भेटायला बोलावतो. मला त्याने मानसिक व शारीरिक त्रास दिला आहे. मला आता सहन होत नाही, म्हणून मी आत्महत्या करीत आहे. मी माझ्या कुटुंबाला सोडून जात आहे. आई, आण्णा मला माफ करा. स्पेशली सॉरी फॉर माय डॉटर, असा मजकूर पूजाने चिठ्ठीत लिहून ठेवला होता.