शहीद जवान नितीन कोळी अनंतात विलीन
By Admin | Published: October 31, 2016 07:52 AM2016-10-31T07:52:13+5:302016-10-31T11:41:20+5:30
चकमकीत शहीद झालेले सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान नितीन सुभाष कोळी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि.31 - जम्मू काश्मीर येथील कुपवाड्यामध्ये शहीद झालेले जवान नितीन कोळी यांना अखेरचा निरोप देण्यात आला आहे. मिरज तालुक्यातील मूळगावी दुधगावात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन कोळी यांचा भाऊ आणि मोठा मुलगा देवराज कोळीने नितीन कोळी यांना मुखाग्नी दिला. शहीद जवान नितीन कोळी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. 'नितीन कोळी अमर रहे'च्या घोषणा दिल्या जात होत्या.
अंत्यसंस्कारासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार राजू शेट्टी, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार जयंत पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड हे उपस्थित होते. दरम्यान, यावेळी दुधगाव-खोची नवीन पुलाला शहीद नितीन कोळी यांचे नाव देणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.
रविवारी रात्री शहीद नितीन सुभाष कोळी यांचे पार्थिव दुधगाव या त्यांच्या मूळगावी दाखल झाले होते. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव कर्मवीर चौकात ठेवण्यात आले होते. दुधगावात प्रत्येक चौकात नितीन कोळी यांना श्रद्धांजली वाहणारे फलक ग्रामस्थांनी उभारले होते. कर्मवीर चौकात अंत्यदर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
Sangli(Maharashtra): Tributes being paid to BSF jawan Koli Nitin Subhash (who lost his life in Machil ceasefire violation) pic.twitter.com/7IXvuz5WmB
— ANI (@ANI_news) October 31, 2016
यानंतर आज सकाळी दुधगाव येथे वारणा नदीकाठी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सीमेवर गस्त घालत असताना पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत नितीन कोळी हे शुक्रवारी रात्री शहीद झाले. त्यांना वीरमरण आल्याचे वृत्त समजताच दुधगावमध्ये शोककळा पसरली. ग्रामस्थांनी शोकसभा घेऊन, दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेऊन, आज सोमवारपर्यंत दुखवटा पाळला आहे. रविवारी कवठेपिरान, सावळवाडी व माळवाडी या तीन गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला.
मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली
शहीद नितीन कोळी यांना देवराज (वय ४ वर्षे) व युवराज (२ वर्षे) अशी दोन मुले आहेत. युवराजच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी वीर सेवा दल मध्यवर्ती समिती संचलित लिटल स्टार इंग्लिश मेडियम स्कूलने घेतली आहे. सध्या देवराज हा याच स्कूलमध्ये लहान गटात शिक्षण घेत आहे.
कोळी कुटुंबीयांना आर्थिक मदत
शहीद जवान नितीन कोळी यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 15 लाख रुपयांची तर सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे कोळी कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.