शहादत की कोई किमत नहीं होती
By admin | Published: February 21, 2016 03:37 AM2016-02-21T03:37:12+5:302016-02-21T03:37:12+5:30
‘‘केंद्रीय विद्यापीठांवर तिरंगा फडकावण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावरून देशभर वादंग निर्माण केले जात आहे. तिरंगा फडकावण्यासाठी किती खर्च केला जाणार, यावर चर्चा रंगत आहेत. तसे
स्मृती इराणी झाल्या भावनिक : तिरंग्यासंदर्भात उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना दिले सडेतोड उत्तर
पुणे : ‘‘केंद्रीय विद्यापीठांवर तिरंगा फडकावण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावरून देशभर वादंग निर्माण केले जात आहे. तिरंगा फडकावण्यासाठी किती खर्च केला जाणार, यावर चर्चा रंगत आहेत. तसे प्रश्नही मला विचारले जात आहेत; पण तिरंग्याची खरी किंमत जाणून घ्यायची असेल, तर देशासाठी शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना विचारा. या सर्वांच्या दृष्टिकोनातून तिरंग्याकडे पाहिल्यानंतर त्याची किंमतच केली जाऊ शकत नाही, हे उमजेल. ‘क्योंकि, शहादत की कोई किमत नहीं होती,’’ अशी भावना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केली.
‘लोकमत आयकॉन्स आॅफ एज्युकेशन महाराष्ट्र’ या कॉफीटेबल पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी दिलखुलासपणे चर्चा केली आणि आपल्या भावनांना वाट करून दिली.
‘‘राजकारण आणि पत्रकारितेमध्ये एक धूसर रेषा आहे. हे मला गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये माझ्यावरून येणाऱ्या हेडलाईन्सवरून दिसून येत आहे,’’ असे सांगून इराणी म्हणाल्या, ‘‘केंद्रीय विद्यापीठांमध्ये तिरंगा फडकावण्याचा निर्णय घेतल्यावर स्मृती इराणींनी असा निर्णय का घेतला, यावर खूप चर्चा झाली. पण, जेव्हा या विद्यापीठांच्या कुलगुरूंची मी बैठक घेतली त्या वेळी त्यांनी जगाला भारताची एकात्मता दाखविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विद्यापीठाने सशक्त विद्यार्थी घडविणे गरजेचे आहे, जे पुढे जाऊन सशक्त समाज घडवतील. त्यासाठी राष्ट्रभक्ती असायला हवी. त्यामुळेच तिरंगा फडकावण्याची कुलगुरूंनी केलेली मागणी मान्य करण्यात आली. तिरंगा लावण्याबाबतचा हिशेब करण्यास सुरुवात केली. तिरंग्याच्या किमतीवरून चर्चा सुरू झाली. एका पत्रकाराने मला विचारले, की विद्यापीठांमध्ये फडकावण्यात येणाऱ्या तिरंग्यासाठी किती किंमत मोजावी लागेल. काही म्हणाले ५० लाख, तर काहींनी एक कोटी रुपये खर्च येईल, असे सांगितले. मी म्हणाले, ‘तिरंग्याची खरी किंमत करायची असेल, तर ज्याचा मुलगा सीमेवर शत्रूंशी लढताना शहीद झाला, त्याच्या कुटुंबाला विचारा तिरंग्याची किंमत काय आहे? मुंबईत २६/११ मध्ये शहीद झालेल्यांच्या कुटुंंबीयांना विचारा, स्वातंत्र्यसंग्रामात लढलेल्या त्या स्वातंत्र्यसैनिकांना विचारा, ज्यांना कितीही पेन्शन मिळत असले तरी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी कमीच आहे. यांना विचारा तिरंग्याची खरी किंंमत.’’ जेव्हा या सर्वांच्या दृष्टिकोनातून आपण तिरंग्याकडे पाहू, तेव्हा आपल्याला समजेल, की तिरंगा अमूल्य आहे, अशी भावना इराणी यांनी या वेळी व्यक्त केली.
शिक्षणासमोरील आव्हाने
शिक्षणासमोरील आव्हानांचा विचार करताना जाणवते, की आज शिक्षणाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहायचे की ज्या संस्था मोठ्या आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्या नजरेतून पाहायचे? की ज्यांच्याकडे काहीही नसताना त्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देत चांगला समाज घडविण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्या नजरेने शिक्षणाकडे पाहायचे? याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे, अशी भावना स्मृती इराणी यांनी व्यक्त केली. ‘मी भूतकाळाकडे न पाहता भविष्याकडे पाहून मार्गक्रमण करेन; पण ते करीत असताना वर्तमानाचा विसर पडू देणार नाही,’ असे विचार केनेडी यांनी मांडले होते. ते विचार आज आपण आपल्या शिक्षणव्यवस्थेत प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे. एकत्र येऊन जर आपण काम केले, तर देशाला सशक्त बनवू शकतो.
पक्षपात सहन करणार नाही
आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकनांसाठी चुकीचे पायंडे पाडण्यात आले आहेत. संस्थेत शिक्षण चांगले मिळत असेल, तरी परदेशी विद्यार्थ्यांची संख्या पाहिली जाते. ती नसेल तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय मानांकनात स्थान मिळत नाही. अशा प्रकारचा पक्षपात भारतातील कोणत्याही सरकारी शिक्षणसंस्था किंवा खासगी संस्थांबरोबर केलेला सहन केला जाणार नाही. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार भारतातील शासकीय व खासगी संस्थांची गुणवत्ता जगासमोर आणण्यासाठी आणि ताकद दाखवून देण्यासाठी ‘नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग सिस्टीम’ तयार करण्याचे काम सुरू आहे. परीक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षकांना बोलावले.