आरे कारशेडला ‘मनसे’ विरोध
By Admin | Published: June 11, 2015 01:42 AM2015-06-11T01:42:56+5:302015-06-11T01:42:56+5:30
आरेमध्ये मेट्रोची कारशेड उभारण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्ण विरोध होता आणि राहील. सरकारला बीपीटीसह अन्य पर्यायी जागा दाखविल्या
मुंबई : आरेमध्ये मेट्रोची कारशेड उभारण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्ण विरोध होता आणि राहील. सरकारला बीपीटीसह अन्य पर्यायी जागा दाखविल्या होत्या. बीपीटीची इतकी मोठी जमीन कोणाच्या घशात घालायची आहे, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. भाजपा सरकारकडून वेगळी आणि लोकहिताची धोरणे राबवली जातील अशी अपेक्षा होती. मात्र यांनी तर काँग्रेस-राष्ट्रवादीची धोरणे राबविण्याचा कार्यक्रम चालवला आहे.
आरेमध्ये मेट्रोची कारशेड होणे हा मुंबईच्या संवेदनशील लोकांची हार असेल असे सांगतानाच हा निर्णय फक्त मुख्यमंत्र्यांनीच घ्यावा, असे ठाकरे म्हणाले. तर, सरकारने हतबलतेचे प्रदर्शन करण्याऐवजी पर्यायांचा विचार करावा अशी मागणी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केली. देवेंद्र फडणवीस सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री असणारे एकनाथ खडसे कॅमे-यासमोर मुलाखतीत आरे कॉलनीत मेट्रो कारशेडला परवानगी देण्याची घोषणा करतात. तर, थोड्याच वेळात मुख्यमंत्री आपल्याच ज्येष्ठ नेत्याचे वक्तव्याला अफवा म्हणतायत हे दुर्देवी आहे. खडसे सातत्याने ज्या नाईलाजाचा उल्लेख करतायत तशी परिस्थिती नाही. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांमधील हा वेगळा संघर्ष आहे जो आरे येथील कारशेडच्या माध्यमातून समोर येत आहे. आरे कॉलनी व्यतिरिक्त खार जमिनी आणि बीपीटी जमिनीचा पर्याय मनसेने यापुर्वीही सरकारसमोर ठेवला होता. त्याचा विचार व्हावा, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.