स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छता हीच सेवा मोहीम, स्वच्छ महाराष्ट्र साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 03:12 PM2017-09-14T15:12:38+5:302017-09-14T15:13:07+5:30
स्वच्छ महाराष्ट्र साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याचे आवाहन करीत राज्य शासनाने स्वच्छता हीच सेवा ही मोहीम हाती घेतली आहे. १५ डिसेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतीमध्येही स्वच्छता हीच सेवा हा विषय घेऊन ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
अमरावती, दि. 14 - स्वच्छ महाराष्ट्र साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याचे आवाहन करीत राज्य शासनाने स्वच्छता हीच सेवा ही मोहीम हाती घेतली आहे. १५ डिसेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतीमध्येही स्वच्छता हीच सेवा हा विषय घेऊन ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर रानातही स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ही मोहीम प्रभावीपणे यशस्वी करावी, असे आवाहन नगरविकास विभागाने केले आहे. १५ सप्टेंबरला स्वच्छता हीच सेवा या मोहिमेला औपचारिक सुरुवात होईल. १७ सप्टेंबरला सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत श्रमदान करून सेवा दिवस साजरा करण्यात येईल. २४ सप्टेंबरला समाजातील सर्व घटकांना श्रमदानात सहभागी करून समग्र स्वच्छता केली जाणार आहे.
२५ सप्टेंबरला शहरातील हॉस्पिटल, उद्याने, पुतळे व स्मारके, बसथांबे, तलाव आणि स्वच्छतागृहांची व्यापक सफाई करण्याचे वेळापत्रक नगरविकासने दिले आहे. त्यानंतर १ आॅक्टोबरला शहरातील प्रसिद्ध स्थळांची व्यापक स्वच्छता मोहीम राबविली जाईल.
ओडीस्पॉटचे सौंदर्यीकरण
जेथे यापूर्वी नागरिक उघड्यावर शौचास जात होते, ती ठिकाणे हागणदारीमुक्त झाली आहेत. त्याठिकाणांचे सुशोभिकरण मोहिमेदरम्यान करण्यात येणार आहे. सोबतच २ आॅक्टोबरपर्यंत सर्वांना वैयक्तिक, सामुदायिक व सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे.
जनआंदोलनाचे स्वरूप
१५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत नागरिक, इतर संस्था व घटकांनी शहरातील शक्य त्याठिकाणी दररोज श्रमदानाद्वारे स्वच्छता करावी. जेणेकरून शहरातील प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ झाल्याचे दृश्य पहावयास मिळेल. याद्वारे शहरांमध्ये ख-या अर्थाने जनआंदोलन उभे राहू शकेल, असा आशावाद नगरविकास खात्याने व्यक्त केला आहे.