महिलेवर सामूहिक अत्याचार
By admin | Published: October 17, 2014 01:03 AM2014-10-17T01:03:12+5:302014-10-17T01:03:12+5:30
शस्त्राचा धाक दाखवून एका निराधार महिलेवर दोन नराधमांनी पाशवी अत्याचार केला. आज पहाटे २.४० च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली.
शस्त्राचा धाक : दोघांचे कृत्य, हुडकेश्वरमध्ये खळबळ
नागपूर : शस्त्राचा धाक दाखवून एका निराधार महिलेवर दोन नराधमांनी पाशवी अत्याचार केला. आज पहाटे २.४० च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली.
हुडकेश्वरमध्ये महाकालीनगर झोपडपट्टी आहे. येथे मजुरांच्या झोपड्या आहेत. अशाच एका झोपडीवजा घरात पीडित महिला राहते. ती मूळची छत्तीसगडची आहे. तिच्या पतीचे पाच वर्षांपूर्वीच निधन झाले. तिला १३, १० आणि ८ वर्षांची तीन मुले आहेत. पीडित महिला मोलमजुरी करून आपले व मुलांचे पोषण करते. आज पहाटे २.४५ च्या सुमारास दोन नराधम तिच्या घरात शिरले. पीडित महिलेला जागे करून आरोपींनी तिला चाकूसारख्या शस्त्राचा धाक दाखवला. ओरडल्यास ठार मारू,अशी धमकी देत आरोपींनी तिला घरातीलच भिंतीपलीकडे (किचनमध्ये) नेले. तेथे दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. ‘कुणाला काही सांगू नको, आम्ही पुन्हा येऊ‘ असे म्हणत आरोपी पळून गेले. आरोपी दूरवर निघून गेल्याची खात्री पटल्यानंतर ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास पीडित महिलेने ‘चोर .. . चोर .. . ‘ म्हणून आरडाओरड केली. त्यामुळे शेजारची मंडळी जागी झाली.
यावेळी पीडित महिलेने चाकूच्या धाकावर दोन आरोपींनी आपले ५ हजार रुपये लुटून नेले‘,असे शेजाऱ्यांना सांगितले. नंतर मुलांना घेऊन झोपी गेली.
वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा
पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक अत्याचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. तिला वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकलला पाठविले. हा प्रकार उघड झाल्यानंतर परिसरात आणि पोलीस प्रशासनातही खळबळ उडाली. पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांनी घटनास्थळी भेट देऊन महिलेसोबतच आजूबाजूच्यांकडेही या घटनेबाबत चौकशी केली. पीडित महिला प्रचंड दडपणात आहे. प्रारंभी तिने या घटनेची माहिती सांगण्यास टाळाटाळ केली. नंतर मात्र सामूहिक अत्याचार झाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस संभ्रमात आहेत. त्यांनी गुन्हा तर दाखल केला. मात्र, पोलिसांना वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलीस उपायुक्त सिंधू स्वत: पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात पोलीस होते. डॉक्टरांकडून अहवाल आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक गती मिळेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
असा झाला उलगडा
नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यानंतर पीडित महिला आपल्या घरातील कामे उरकून स्वयंपाक करू लागली. सकाळी ८.३० च्या सुमारास झोपडपट्टीतील एकाने १०० क्रमांकावर फोन करून झोपडपट्टीत लुटमार झाल्याची माहिती दिली. नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने हुडकेश्वर पोलिसांना कळविले. त्यानुसार, ठाणेदार तुकाराम मुंढे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. झोपडीतून चोरट्यांनी ५ हजार रुपये लुटून नेल्याची बाब त्यांना खटकली. त्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पीडित महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस करायला लावली. त्यानंतर पीडित महिलेने सामूहिक अत्याचाराची वाच्यता केली.
दोन संशयित ताब्यात
निवडणुकीची धामधूम संपायला असताना घडलेल्या या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे पोलिसांचेही धाबे दणाणले आहे. पीडित महिलेने सांगितलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी आज या झोपडपट्टीसोबतच आजूबाजूच्याही झोपडपट्ट्यांमध्ये शोधमोहिम राबवली. सायंकाळी ६ च्या सुमारास पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. महिलेला मेडिकलमधून परत आणल्यानंतर तिच्याकडून संशयितांची ओळखपरेड करवून घेतली जाणार आहे.