वसई, विरारमध्ये भाजीपाला प्रचंड महागला
By admin | Published: June 6, 2017 02:44 AM2017-06-06T02:44:21+5:302017-06-06T02:44:21+5:30
भाजीपाला व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत न झाल्याने वसई विरारमध्ये भाजीपाला महागला आहे
शशी करपे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : शेतकऱ्यांच्या संप माघारी बाबतच्या संभ्रमामुळे अजूनही येथील भाजीपाला व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत न झाल्याने वसई विरारमध्ये भाजीपाला महागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दुध पुरवठा बंद झाल्याने लोकांचे हाल होऊ लागले आहेत. सोमवारच्या बंदमुळे मंगळवारी दूध येणार नसल्याचे वितरकांनी सांगितले. तर गहू, तांदुळ आणि कडधान्याची आवक निम्म्याहूनही कमी झाल्याने त्याची झळ वसईकरांना सोसावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या संपामुळे भाजीपाला मिळत नसल्याचा फायदा चिकन आणि मटण विक्रेत्यांना होऊ लागला आहे. दोन दिवसात चिकन आणि मटणचे दर काही प्रमाणात वाढलेले दिसून आले.
१ जूनपासून शेतकरी संपावर गेल्याचा परिणाम वसईत आता जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून भाजीपाल्याची आवक एकदम कमी झाल्याने भाजीपाल्यांचे दर तीनपट वाढले आहेत. वसईत दररोज साधारण चौदाशे टन भाजीपाल्याची आवक होते. दोन दिवसांपासून ही आवक निम्म्याहून कमी झाली आहे. तर सोमवारी शेतकऱ्यांनी बंद पाळल्याने वसईत भाजीपाल्याचे ट्रक आले नाहीत. त्यामुळे वसईतील अनेक बाजारपेठा आज बंद होत्या. भाजीपाला नसल्याने किरकोळ विक्रेत्यांनी दरात प्रचंड वाढ केली .
आवक प्रचंड प्रमाणात घटल्याने भाजीपाल्याचे दर तीनपटीने वाढले आहेत. त्याचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसू लागला आहे. टोमॅटो, सिमला मिरची, फरसबी, हिरवा वाटाणा, मिरची, लिंबू, कोथिंबीर, मिरची, गाजर, काकडी याची मागणी हॉटेलमध्ये जास्त प्रमाणात असते. नेमक्या याच भाज्यांचे दर तीनपट वाढल्याने आर्थिक फटका बसू लागला आहे, अशी माहिती हॉटेल व्यावसायिक संतोष शेट्टी यांनी दिली.
भाजीपाल्यासह तांदूळ, गहू आणि कडधान्याच्या पुरवठ्यावर मोठ्या परिणाम होऊ लागला आहे. संपापूर्वी वसईत दररोज तांदूळ २ हजार ८०० टन आणि गहूची १ हजार २०० टन इतकी आवक होती. संपामुळे तांदूळ, गव्हासह कडधान्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. सोमवारी गहू २९० टन आणि तांदूळ ५५० टन इतकाच वसईच्या बाजारात आला होता., अशी माहिती वसई तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली. तांदूळ, गहू आणि कडधान्याचे दर अद्याप स्थिर असले तरी संप असाच सुुरु राहिला तर मात्र त्यांचेही दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
वसई विरार परिसरात दररोज साधारण तीन लाख लिटर पिशवीच्या दुधाचा पुरवठा होतो. हे दुध नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादकांकडून पुरवले जाते. शेतकऱ्यांच्या संपामुळे दूध पुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दुधाची आवक चाळीस टक्क्यांनी घटली आहे. तर सोमवारी बंद असल्याने मंगळवारी दूध मिळणार नसल्याचे दूध उत्पादकांनी सांगितल्याने वसई विरारकांना मंगळवारी पिशवीचे दूध मिळणार नाही, अशी माहिती वसईतील दूध वितरक प्रशांत चौबळ यांनी दिली. महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक संघासह गोवर्धन, गोकुळ, गोदावरी, प्रभात, क्रिष्णा, हॅरिटेज यांचे दूध वसई विरार परिसरात जास्त प्रमाणात वितरित होते. नेमक्या याच उत्पादकांच्या दूध वितरणावर परिणाम झाल्याने वसईत दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे.
जेवण आणि नाश्त्यासाठी लागणाऱ्या भाजीपाल्याचे घाऊक दर तीन पटीने वाढले आहेत. त्यात दूधाचा तुटवडा असल्याने पंचाईत झाली आहे. बाहेर भाजी खरेदी करण्यापेक्षा हॉटेलमधील जेवण स्वस्त असल्याने ग्राहक सध्या हॉटेलमध्ये जेवणे पसंत करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. भाजीपाला महागला तरी दर वाढवलेले नाहीत.
-संतोष शेट्टी, हॉटेल व्यावसायिक
दोन दिवसांपासून अनियमित आणि कमी दूध पुरवठा होऊ लागल्याने दुधाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच सोमवारच्या बंदमुळे मंगळवारी दूध पुरवठा होणार नाही. संपाबाबतचा संभ्रम दूर होत नाही तोपर्यंत वसईतील दुध पुरवठा पुर्ववत होणार नाही. त्याचा त्रास वसईकरांना सहन करावा लागणार आहे.
-प्रशांत चौबळ, दूध वितरक
शेतकऱ्यांच्या संपामुळे तांदूळ आणि गहूची आवक निम्म्याहून कमी झाली आहे. ती सुधारेपर्यंत दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-प्रकाश पाटील, उपाध्यक्ष,
वसई तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती
तलासरी शंभर टक्के बंद
तलासरी : शेतकऱ्याच्या संपाला पाठींबा देण्यासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला तलासरीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला, तलासरी, उधवा गावातील सर्व बाजार पेठ बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी सहकार्य केले. तलासरीत सोमवार हा आठवडा बाजारचा दिवस परंतु बंद मुळे बाजार भरला नाही त्याचा फटका आदिवासींना बसला. आठवड्याचा भाजीपाला व इतर खरेदी साठी आलेल्यांना हात हलवीत परत जावे लागले.
>भाजीपाल्याचे सोमवारचे घाऊक दर (किलोमध्ये)
भाज्या संपापूर्वी सोमवारचे दर
टोमॅटो १२ रुपये ६० रुपये
सिमला मिरची ४० ते ४५ रुपये ९० ते १०० रुपये
फरसबी ३० रुपये ८० रुपये
हिरवा वटाणा ३० रुपये ८० रुपये
काकडी १६ रुपये ४० रुपये
गाजर ३५ रुपये ९० रुपये
भेंडी ३० रुपये ७० रुपये
वांगी २० रुपये ४५ रुपये
कोथिंबीर २५ रुपये जुडी ८० रुपये जुडी
लिंबू १८० रुपये १०० नग ३०० रुपये १०० नग
>बोईसरला भाजीपाल्याची प्रतिदिन २० टन आवक घटली
बोईसर: या शहरातील भाजीपाल्याची आवक प्रतिदिन २० टन घटली असून सुरतेहून येणारा तुटपुंजा भाजीपाला आणि स्थानिक किरकोळ भाजीपाल्यावरच सध्या नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे मात्र तारापूर एम आय डी सी तील अमूल कंपनीत गुजरात राज्यातून येणाऱ्या दुधामुळे दुधाचा पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही.बोईसारला ४ ते ५ मोठे भाजीपाल्याचे घाऊक (होलसेल) व्यापारी असून या सर्वांकडे नाशिक जिल्ह्यातिल पंचवटी मार्केट, सुरत, वाशी मार्केट, आणि स्थानिक छोट्या छोट्या शेती बागायती इत्यादी ठिकाणाहून विविध प्रकारचा सुमारे २० टन भाजीपाला प्रतिदिन येत असतो. परंतु सर्वत्र शेतकऱ्यांच्या संपामुळे भाजीपाल्याची आवक घटली . भाजीपाल्याच्या तुटवडया मुळे बोईसर व परिसरातील लाखो नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकही त्रस्त झाले असून सुकलेला आणि शिळा भाजीपाला चढ्या भावाने विकला जातोय त्याचप्रमाणे लग्न सोहळ्यात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवत असल्याने भाजीपाल्याची आवक कधी वाढते व पुरवठा सुरळीत होतो याकडे लक्ष लागले आहे.