Supriya Sule Letter, CM Eknath Shinde: सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, केली एक विशेष मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 03:14 PM2023-02-05T15:14:53+5:302023-02-05T15:17:32+5:30

काय आहे ती मागणी.. वाचा सविस्तर

Mata Ramai birth anniversary should be celebrated at the government level Supriya Sule demand to CM Eknath Shinde | Supriya Sule Letter, CM Eknath Shinde: सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, केली एक विशेष मागणी

Supriya Sule Letter, CM Eknath Shinde: सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, केली एक विशेष मागणी

googlenewsNext

Supriya Sule Letter to CM Eknath Shinde: ७ फेब्रुवारी रोजी येणारी माता रमाई यांची जयंती या वर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्याप्रती समाजामध्ये खूप आदर व आपुलकी आहे, असे त्यांनी नमूद केले.

पत्रात लिहिण्यात आले आहे की...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांची १२५ वी जयंती दि. ७ फेब्रुवारी, २०२३ रोजी येत आहे. माता रमाबाई आंबेडकर यांचा जन्म दि. ७ फेब्रुवारी, १८९८ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. माता रमाई व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १९०६ मध्ये भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये विवाहबद्ध झाले. तेव्हापासून त्यांनी भारतरत्न बाबासाहेबांना शेवटपर्यंत साथ दिली. डॉ. बाबासाहेब अमेरिकेत शिकवण घेत असताना त्यांनी स्वतःच्या मुलांच्या निधनाचे दुःख स्वतः सहन केले पण डॉ. बाबासाहेबांच्या कार्यात व अभ्यासात अडथळा येऊ नये याची वेळोवेळी काळजी घेतली.
माता रमाई एक साध्या व कर्तव्यदक्ष स्त्री होत्या. कोणतीही आपत्ती असो, कोणाचीही मदत घेण त्यांना कधीच पटले नाही. आर्थिक स्थिती बिकट असताना दिवसभर काम करून संध्याकाळी त्या घराबाहेर निघून ३ ते ४ कि. मी. अंतरावर जाऊन शेण आणत. शेणाच्या गवऱ्या तयार करून विकत असत. जवळपासच्या परिसरातील स्त्रिया म्हणत की बरिस्टरची पत्नी असूनही त्यांनी आपल्या डोक्यावर गाईचे शेण घेतले आहे. त्यावर माता रमाई म्हणायच्या, "घरकाम करण्यात काय लाज". डॉ. बाबासाहेब अनेकदा घराबाहेर राहत असत. त्यांनी जे कमविले ते पत्नीकडे सोपवायचे आणि आवश्यकतेनुसार मागणी करायचे. त्यातही घर खर्च करून माता रमाई काही पैसे गोळा करीत कारण त्यांना माहीत होते की डॉ. बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या अनेक सामाजिक चळवळी आणि सत्याग्रहांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीत महिला मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायच्या. त्यामुळे लोक त्यांना 'आईसाहेब' व डॉ. आंबेडकर यांना 'बाबासाहेब' म्हणून संबोधत असत.

अशा समाधानाची, सहकार्याची आणि सहिष्णुतेच्या मूर्ती असलेल्या माता रमाई यांनी समाजासाठी केलेला त्याग हा मोठा असून तो सर्वसामान्य जनतेपर्यंत व नविन पिढीला मार्गदशक ठरण्याकरिता प्रबोधन, लोकशिक्षणाच्या हेतूने यावर्षीची त्यांची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी करण्याकरिता राज्य शासनाने निर्णय घ्यावा अशी आपणास विनंती आहे. तसेच शासनाच्या वतीने संपूर्ण वर्षभरात महामानवांना अभिवादन करण्यासाठी प्रकाशित केल्या जाणाऱ्या यादीमध्ये त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती दरवर्षी साजरी करण्याबाबत कायमस्वरूपी समावेश करण्यात यावा, ही विनंती.

Web Title: Mata Ramai birth anniversary should be celebrated at the government level Supriya Sule demand to CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.