मातंग समाज विविध मागण्यांसाठी उभारणार राज्यभर लढा; समाजातील सर्व पक्षीय नेत्यांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 06:28 PM2020-08-25T18:28:24+5:302020-08-25T18:29:36+5:30
मागण्या मान्य न झाल्यास कोरोना महामारीनंतर रस्त्यावर लाखोंच्या संख्येने उतरण्याचा निर्णय
पुणे : राज्यामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रात मातंग समाज लोकसंख्येने जास्त असूनही दुर्लक्षित राहिला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाजातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन, राज्यभर लढा उभारून एल्गार पुकारण्याचा निर्धार केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास कोरोना महामारीनंतर रस्त्यावर लाखोंच्या संख्येने उतरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
राज्यातील ३० विविध मातंग समाज पक्ष, संघटना प्रमुख यांची बैठक मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेद्वारे "मातंग स्पिक अभियान" ची घोषणा बैठकीचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केली. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, मछिन्द्र सकटे, हनुमंत साठे, प्रा.मिलिंद आव्हाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हे वर्ष अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा ही अभियानाची मुख्य मागणी असल्याचे बागवे यांनी सांगितले.
बार्टीच्या धर्तीवर आर्टी सुरू करून समाजाचा विकास करावा, मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य असावा, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे कामकाज पुन्हा सुरू करावे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक तात्काळ करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आली. या मागण्यांसाठी राज्यभर सर्व समाज व समाजाच्या नेत्यांचे ऐक्य घडवून आणून, जनजागृती करण्यात येणार असल्याचे बागवे यांनी सांगितले.
------