मातंग समाजाचा चक्काजाम
By Admin | Published: August 23, 2016 05:56 AM2016-08-23T05:56:55+5:302016-08-23T05:56:55+5:30
अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मातंग समाजासाठी आयुष्यभर लढणाऱ्या या नेत्याच्या निधनाची बहुतांश माध्यमांनी दखलच न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या मातंग समाजाच्या कार्यर्त्यांनी सोमवारी मुंबईकडे येणारी आणि मुंबईबाहेर जाणारी वाहतूक चार तास अडवली.
मातंग समाजासाठी स्वत:ला वाहून घेणारे बाबासाहेब गोपले अनेक दिवसांपासून फुप्फुसाच्या विकाराने त्रस्त होते. घाटकोपर येथील हिंदू सभा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलविले होते. मात्र रविवारी सकाळी ८ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्यात बाबासाहेब गोपले यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन केले. तसेच मातंग समाजाच्या हितासाठी त्यांनी अनेक आंदोलनेदेखील केली
आहेत. (प्रतिनिधी)
>वाहनांच्या रांगा
गोपले यांची अंत्ययात्रा मानखुर्दच्या साठेनगर येथील त्यांच्या राहत्या घरातून सोमवारी सकाळी ११ वाजता शिवाजी पार्कच्या दिशेने निघाली. दुपारी १ वाजता त्यांची अंत्ययात्रा चेंबूरच्या अण्णाभाऊ साठे उद्यानाजवळ पोहोचली. सुमननगर जंक्शनवर चक्काजाम केला. त्याचा फटका ठाणे आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला बसला.
>शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बाबासाहेब गोपले यांच्या पार्थिवावर
शिवाजी पार्क स्मशानभूमीत सायंकाळी
७ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी केंद्रीय
सामाजिक मंत्री रामदास आठवले, समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, डॉ. प्रीतिश
कुमार-जळगांवकर, राष्ट्रवादी सचिव प्रकाश भोसले, आरपीआयचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, डॉ. विजय मोरे, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र पवार उपस्थित होते.