म्हात्रे हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर ठपका
By Admin | Published: February 27, 2017 03:57 AM2017-02-27T03:57:26+5:302017-02-27T03:57:26+5:30
मनोज म्हात्रे यांच्या हत्येला गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा
भिवंडी : महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक आणि सभागृह नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येला गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अर्थसंकल्पी अधिवेशनात करणार आहोत. या प्रकरणी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालवून सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, अशी मागणीही करणार असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
हल्ल्यातील प्रमुख आरोपी प्रशांत म्हात्रे याला पळण्यासाठी आमदार, खासदार यांनी मदत केली, असा थेट आरोपही त्यांनी केला. खासदार कपिल पाटील यांच्यासोबत आरोपी प्रशांतचे फोटो त्यांनी पत्रकारांना दाखवत हत्येमागचा संबंध सूचित केला.
म्हात्रे यांच्या कुटुंबीयांची रविवारी त्यांनी भेट घेऊन सांत्वन केले. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा त्यांनीही पत्रकारांशी बोलताना दिला. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे प्रमुख आरोपीला अटक झाली नाही. कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून सरकार आणि पोलिसांचे हे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपात आज सरसकट गुंडांना प्रवेश दिला जात असल्याने त्यांची हिम्मत वाढत आहे. गुन्हेगारांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही. राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सरकारसाठी ही शरमेची बाब असल्याचे विखे-पाटील यांनी नमूद केले. त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.
म्हात्रे यांच्या हत्येमुळे भिवंडी शहरात सध्या दहशतीचे वातावरण असल्याचा दावाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. (प्रतिनिधी)