पूर्व विदर्भात वाढले माता मृत्यूचे प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2017 04:04 AM2017-03-27T04:04:47+5:302017-03-27T04:04:47+5:30
माता मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्याचा आरोग्य विभाग प्रयत्नशील असला तरी त्याला अद्याप पुरेसे यश आलेले
सुमेध वाघमारे / नागपूर
माता मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्याचा आरोग्य विभाग प्रयत्नशील असला तरी त्याला अद्याप पुरेसे यश आलेले दिसून येत नाही. विशेषत: नागपूर विभागातील सहा जिल्हे मिळून २०११-१२मध्ये माता मृत्यूची संख्या २३९ होती, ती २०१५-१६ मध्ये २५६वर गेली आहे. यात वर्धा व नागपूर जिल्ह्यात प्रमाण जास्त असल्याचे वास्तव आहे.
हलगर्जीपणासोबतच गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत यामुळे प्रसूतीच्या वेळी मातांचे मृत्यू होत आहेत, हे कटु सत्य नाकारता येत नाही. सशक्त पिढी निर्माणासाठी आई सशक्त होणे, ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सर्वात कमी मृत्युदर गुजरातमध्ये
इतर राज्याच्या तुलनेत सर्वात कमी माता मृत्युदर गुजरातमध्ये आहे. केंद्राची ‘चिरंजीवी’ योजना येथे प्रभावीपणे राबविली जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, यात राज्य सरकारनेही मदत केली आहे. डॉक्टरला एका रुग्णामागे ३ हजार ८०० रुपयांची मदत मिळते. यात रुग्णांच्या पोषणापासून ते त्याच्या औषधांचा खर्च संबंधित डॉक्टरमार्फतच केला जातो. यामुळे रुग्णांना योग्य उपचारही मिळतो. याशिवाय ग्रामीण भागात इस्पितळ उघडण्यास पाच लाख रुपयांचे अनुदानही दिले जाते. विशेष म्हणजे आठ मिनिटांच्या आत दारासमोर उभी असणारी रुग्णवाहिका ही जमेची बाजू आहे.
माता मृत्यू रोखण्यासाठी ‘डेथ आॅडिट’ आवश्यक
महाराष्ट्रात प्रसूत होणाऱ्या एक लाख महिलांपैकी १०६ माता दगावतात. तामिळनाडूमध्ये हे प्रमाण ९७ तर केरळमध्ये ८१ आहे. केरळचा ‘पॅटर्न’ आपल्याकडे लागू करायचा असेल तर आरोग्यासाठी स्वतंत्र केडर निर्माण होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, याचे ‘डेथ आॅडिट’ होऊन व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करणे महत्त्वाचे आहे. असे झाल्यास तरच जास्तीत जास्त मातांचे प्राण वाचविले जाऊ शकतील.
- डॉ. नोझेर शेरियार, स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ.