माथाडी कामगार, व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

By Admin | Published: May 24, 2016 02:08 AM2016-05-24T02:08:32+5:302016-05-24T02:08:32+5:30

फळे, भाजीपाला, कांदा व बटाटा बाजार समितीमधून वगळण्याचे सूतोवाच राज्य शासनाने करताच बाजार समित्यांमधील कामगार व व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

Mathadi Worker, Statewide Movement Warning of Traders | माथाडी कामगार, व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

माथाडी कामगार, व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

googlenewsNext

नवी मुंबई : फळे, भाजीपाला, कांदा व बटाटा बाजार समितीमधून वगळण्याचे सूतोवाच राज्य शासनाने करताच बाजार समित्यांमधील कामगार व व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये मंगळवारी विशेष बैठक होणार असून, २५ मेपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
राज्य शासन बाजार समितीमधून भाजीपाला व फळे वगळण्याची अधिसुचना लवकरच काढणार असल्याचे समजताच मुंबई बाजार समितीमध्ये खळबळ उडाली आहे. ३० हजारपेक्षा जास्त मापाडी कामगार, १५हजारपेक्षा जास्त रोजंदारी कामगार, व्यापारी, त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी मिळून एक लाखपेक्षा जास्त नागरिकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. साखर, डाळी व इतर वस्तू यापूर्वीच बाजार समितीमधून वगळल्या आहेत. आता भाजीपाला व फळे वगळली तर मुंबई बाजार समिती बंद होवून माथाडी कामगार बेरोजगार होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून बाजार समितीच्या विरोधी भूमिका घेतली जात आहे. यापूर्वीही त्यांनी अशाप्रकारचे सूतोवाच केले होते. परंतु कामगारांनी आंदोलन केल्यानंतर माघार घेतली होती. आता पुन्हा बाजार समितीमधून वगळण्याची भूमिका घेतली जात असून त्याला तीव्र विरोध करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
बाजार समितीमधील व्यापारी व कामगार प्रतिनिधींची बैठक मंगळवारी माथाडी भवनमध्ये होणार आहे. या बैठकीमध्ये आंदोलनाचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे. राज्यातील सर्वच बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार असल्याने राज्यव्यापी आंदोलन उभे केले जाणार आहे. २५ मे रोजी मुंबई बाजार समिती बंद ठेवून जाहीर मेळावा होणार असून त्यामध्ये आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.

भाजपा सरकार सातत्याने बाजार समिती व कामगारांच्या विरोधात भूमिका घेत आहे. माथाडी कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाच्या विरोधात रोडवर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल.
- नरेंद्र पाटील, सरचिटणीस,
माथाडी संघटना

Web Title: Mathadi Worker, Statewide Movement Warning of Traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.