माथेरानमध्ये शिक्षणाचा बोजवारा
By Admin | Published: June 13, 2016 03:20 AM2016-06-13T03:20:02+5:302016-06-13T03:20:02+5:30
शाळा सुरू होण्यास काही दिवसच उरलेले असताना विद्यार्थ्यांना नक्की कुठल्या शाळेत प्रवेश द्यावा याबाबतीत पालकवर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली
माथेरान : शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात देखील राजकीय वादळ घोंगावताना दिसत असून शाळा सुरू होण्यास काही दिवसच उरलेले असताना विद्यार्थ्यांना नक्की कुठल्या शाळेत प्रवेश द्यावा याबाबतीत पालकवर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यामुळे शिक्षणाचा पुरता बोजवारा उडण्याची चिन्हे निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक जीवनशैली धोक्यात आली आहे.
येथे १९६८ मध्ये शिक्षणमहर्षी शांताराम यशवंत गव्हाणकर यांनी पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू केले होते. तत्पूर्वी पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत सर्वच विद्यार्थी नगरपरिषदेच्या शाळेतच शिक्षण घेत होते. परंतु मागील तीन वर्षांपासून गव्हाणकर शाळेने दरवर्षी एक एक वर्ग बंद करून ही शाळा कायमस्वरूपी बंद करण्याच्या मार्गावर असल्याने उशिरा का होईना राजकीय मंडळींना निवडणुका जवळ आल्यावर जाग आली आहे. पालक व स्थानिकांच्या बैठका बोलावून राजकीय मंडळी आश्वासन देत आहेत.
या शाळेबाबत अधिकारी, अंतर्गत राजकारण करीत असून याचा नाहक त्रास विद्यार्थी, पालकांना होत आहे. माथेरानसारख्या दुर्गम भागात शिक्षणाची ज्ञानगंगा आणून गोरगरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने शांताराम गव्हाणकर यांनी शाळा सुरू केली होती. मात्र आता ही शाळा बंद पडण्याच्या स्थितीत असून यामुळे स्थानिकांकडून नाराजी व्यक्त के ली जात आहे.
सध्या येथे सातवीपर्यंतचे वर्ग सुरू असतात. गव्हाणकर शाळा बंद होणार आहे हे वर्षापूर्वी जवळपास निश्चित झाले होते, परंतु यंदा विद्यार्थ्यांना वेठीस धरूनच आगामी निवडणुकीचे यानिमित्ताने राजकारण शिजले जात असल्याचे जाणकार मंडळींचे म्हणणे आहे. १० मे रोजीच्या अवकाळी वादळी पावसात शाळेची वरील भागांची नासाडी झाली. या महत्त्वपूर्ण कामास लोकप्रतिनिधींनी गती द्यायला हवी होती, कामाची ती गती नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त के ली आहे. (वार्ताहर)