माथेरानकरांनी एका सुरात सांगितले ई-रिक्षा हवीच! ‘टिस’च्या पथकाने साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 07:16 AM2023-01-24T07:16:29+5:302023-01-24T07:16:53+5:30

मोरानमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ५ डिसेंबरपासून ई-रिक्षा सुरू करण्यात आली असून अभ्यासानंतर ही सेवा कायम करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Matherankar said in a chorus that we need e-rickshaw Communication made by the team of Tis | माथेरानकरांनी एका सुरात सांगितले ई-रिक्षा हवीच! ‘टिस’च्या पथकाने साधला संवाद

माथेरानकरांनी एका सुरात सांगितले ई-रिक्षा हवीच! ‘टिस’च्या पथकाने साधला संवाद

Next

कर्जत :

मोरानमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ५ डिसेंबरपासून ई-रिक्षा सुरू करण्यात आली असून अभ्यासानंतर ही सेवा कायम करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टिस) त्याबाबत अहवाल सादर करणार आहे. त्यांच्या पथकाने माथेरानकरांचा कानोसा घेतल्यानंतर ई-रिक्षा हवीच, असे ठाम मत माथेरानकरांनी व्यक्त केले आहे. 

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या प्राचार्या अनिता भिडे, प्रा. सुहास भस्मे यांनी या सेवेबाबत माथेरानच्या नागरिकांसोबत  संवाद साधला. माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी सर्वसमावेशक निर्णय झाला पाहिजे, असे सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक सिस्टर पाऊलीन, कल्पना पाटील व लक्ष्मण ढेबे यांनी ई-रिक्षामुळे विद्यार्थ्यांची पायपीट थांबली असून, अभ्यासातील लक्ष वाढले असल्याचे निरीक्षण नोंदवत कॉन्व्हेंट शाळा दस्तुरी नाक्यापासून ५ किमी दूर असल्याने शाळेला शिक्षक मिळत नाहीत. ई-रिक्षा कायमस्वरूपी सुरू झाली, तर चांगले  शिक्षक मिळू शकतील, अशी भावना व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हरिभाई मेहता व अरविंद शेलार यांनी ई-रिक्षा वरदान ठरत असल्याचे सांगितले. हनिफ चिपाडे यांनी त्यांच्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी १२ तास वाट पाहावी लागली होती. आता हा त्रास कायमचा संपला पाहिजे. कायद्यापेक्षा नागरिकांचे प्राण महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. 

माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी ई-रिक्षाचा वापर फक्त स्थानिक रहिवाशांसाठी मर्यादित असावा व ती स्टेशनपर्यंत चालवावी, अशी मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश अंतिम आहे. कोर्टाच्या आदेशाला फाटे फोडण्याचे काम कोणी करू नये, असे श्रमिक रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश सुतार यांनी सांगितले. प्राचार्य अनिता भिडे यांनी ई-रिक्षाच्या परिणामांचा अभ्यास करताना येथील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व पर्यावरणाचा समतोल या गोष्टींवर भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. आमचे पथक पुढील काही दिवस नागरिकांसोबत थेट संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. अश्वपाल संघटनेच्या आशा कदम, विकास रांजणे, पालिकेचे मुख्याधिकारी सुरेखा भणगे, पोलिस उपनिरीक्षक शेखर लव्हे आदी उपस्थित होते.

माथेरानकर काय म्हणतात..
  ई-रिक्षा माथेरानच्या पर्यटनात क्रांती घडवेल
  विद्यार्थ्यांची पायपीट थांबली असून, अभ्यासातील लक्ष वाढले
  माथेरानचा वर्षाचा शंभर दिवसांचा व्यवसाय १५० दिवसांपर्यंत जाईल

ई-रिक्षाच्या वाहतुकीतील बदलाचे माथेरानकरांना व पर्यटकांना होणारे फायदे, तोटे व या बदलामुळे एखादा समूह बाधित होणार असल्यास कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला जाणार आहे.
- अनिता भिडे, प्राचार्य, टाटा सामाजिक विज्ञान संस्था

Web Title: Matherankar said in a chorus that we need e-rickshaw Communication made by the team of Tis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.