माथेरानच्या मिनी ट्रेनला कायमचा ब्रेक?
By Admin | Published: August 24, 2016 01:49 AM2016-08-24T01:49:29+5:302016-08-24T01:49:29+5:30
शतकमहोत्सव साजरा केलेली नेरळ -माथेरान मिनीट्रेनला मे २०१६ मध्ये लागलेले ग्रहण संपण्याचे नाव घेत नाही.
अजय कदम,
मुंबई- शतकमहोत्सव साजरा केलेली नेरळ -माथेरान मिनीट्रेनला मे २०१६ मध्ये लागलेले ग्रहण संपण्याचे नाव घेत नाही. कारण रेल्वेने अनिश्चित काळासाठी बंद केलेली मिनीट्रेन कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे. मिनीट्रेन इंजिनातील बिघाडामुळे सातत्याने प्रवासी सेवा रद्द करण्याची वेळ आलेल्या रेल्वे प्रशासनाने नेरळ लोकोमधील दोन इंजिने दार्जिलिंगसाठी रवाना केली आहेत. आधीच इंजिनामुळे प्रवासी सेवेवर परिणाम होत असताना आता आहेत ती इंजिने देखील मिनीट्रेनच्या
ताफ्यातून काढली जात असल्याने नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे भवितव्य अंधारात आहे.
मिनीट्रेनचे डबे नॅरोगेज रु ळावरून मे २०१६ मध्ये लागोपाठ दोन वेळा घसरले. त्यानंतर नेरळ-माथेरान मिनीट्रेन आणि माथेरान - अमन लॉज शटल सेवा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध सहाय यांनी अनिश्चित काळासाठी बंद केली होती.त्यानंतर आजतागायत मिनीट्रेन आणि शटल सेवा बंद आहे. मात्र या काळात खासदार श्रीरंग बारणे यांना मध्य रेल्वेचे तत्कालीन मुंबई विभागीय महाव्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी मिनीट्रेन लवकर सुरु केली जाईल, असे आश्वासन मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिले होते. मात्र रेल्वे प्रशासनाला १०० वर्षे जुन्या आणि जगातील वारसासाठी युनेस्कोकडे सादर करण्यात आलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेनला रेल्वे प्रशासनाला नॅरोगेजवर कायम ठेवायचे नसल्याचे दिसून येत आहे. कारण २० किलोमीटर लांबीच्या या छोट्या लाइनवरील २०० हून अधिक वेडीवाकडी आणि जागच्या जागी असलेली वळणे यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या मिनीट्रेनच्या भविष्याबाबत रेल्वे प्रशासन उदासीन असल्याचे बोलले जात आहे.
या मिनीट्रेनच्या ताफ्यातील आणखी दोन इंजिने नेरळ येथून मंगळवारी हलविण्यात आली. यापूर्वी एनडीएम ६००,६०१, ६०२ आणि ६०३ ही १९९५ मध्ये मिनीट्रेनच्या सेवेत आली. त्यातील एनडीएम ६०१ आणि ६०२ ही दोन इंजिने २००५ मध्ये रेल्वेने दार्जिलिंग येथील छोट्या ट्रेनसाठी नेली आहेत. त्यावेळी जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या ट्रॅकचे नुकसान झाल्याने मिनीट्रेन बंद होती.
आता देखील मिनीट्रेनचे प्रवासी डबे रु ळावरून घसरल्याने मिनीट्रेनची वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद आहे. त्याचा फायदा घेऊन नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या ताफ्यात असलेली दोन इंजिने दार्जिलिंग येथे पाठविण्यात येत आहेत. एनडीएम ६०० आणि ६०३ ही हिरव्या रंगात नटलेली आणि नेरळ-माथेरान प्रवासात येथील निसर्गाच्या रंगाशी एकरूप झालेली दोन इंजिने नेरळ लोकोमधून प्रथम परळ वर्कशॉप आणि तेथून दार्जिलिंग असा प्रवास करण्यास तयार झाली आहेत.
नेरळ येथून लोकोमधून ही दोन्ही इंजिने दुपारी बारा वाजता नेरळ -माथेरान मिनीट्रेन ट्रॅकने नेरळ पेट्रोल पंप येथे आणण्यात आली.तेथे मोठ्या ट्रॅकमध्ये क्र ेनद्वारे भरून नेण्यात आली. परळ येथून ही दोन्ही इंजिने दार्जिलिंग येथे नेण्यात येणार आहेत. कुर्ला येथील डिझेल युनिटच्या अभियंत्यांनी इंजिने ट्रॅकमध्ये भरून घेण्याचे काम केले.तेथे कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी काही वेळ माथेरान येथील सहकारी कार्यकर्ते यांच्यासह रेल्वेला जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
>एअर ब्रेक प्रणालीच्या इंजिनची बांधणी
मिनीट्रेनसाठी एअर ब्रेक प्रणाली असलेली तीन इंजिनांची बांधणी केली आहे. त्यातील एक इंजीन हे नेरळ येथे आले आहे, तर दुसरे इंजीन काही दिवसात नेरळ लोकोमध्ये पोहचणार आहे.दार्जिलिंग येथे नेण्यासाठी नेरळ लोकोमधून निघालेली दोन इंजिने ही जुन्या बांधणीची असल्याने पाठविली जात आहेत. - नरेंद्र पाटील, मुख्य जनसंपर्कअधिकारी, मध्य रेल्वे