माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा धावणार!
By admin | Published: August 25, 2016 06:04 AM2016-08-25T06:04:26+5:302016-08-25T06:04:26+5:30
मिनी ट्रेन बंद करण्याचा रेल्वेचा कोणताही विचार नसल्याचे मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
मुंबई : ‘माथेरानची राणी’ म्हणून ओळखली जाणारी मिनी ट्रेन बंद करण्याचा रेल्वेचा कोणताही विचार नसल्याचे मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
या ट्रेनची दोन इंजिन नेरळ येथून क्रेनच्या सहाय्याने ट्रकमध्ये टाकून नेण्यात आले. त्यानंतर, अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. याबाबत बोलताना हे इंजिन दार्जिलिंग येथे अद्ययावत करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे ही ट्रेन लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती गोयल यांनी दिली.
मंगळवारी नेरळ येथे उभ्या असलेल्या या ट्रेनचे दोन इंजिन एका मोठ्या ट्रकमध्ये ठेवून नेण्यात आले. त्यामुळे मिनी ट्रेन बंद होत असल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. यासंदर्भात मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी सांगितले की, मिनी ट्रेन बंद होत असल्याची माहितीत तथ्य नाही. इंजिन अद्ययावत करण्यासाठी दार्जिलिंगला पाठविण्यात येत आहेत. अद्ययावत तंत्रज्ञान जोडून ती पुन्हा माथेरानला आणली जातील. या आधीही दोन इंजिन तेथील कार्यशाळेत नेण्यात आल्याचे गोयल म्हणाले.
त्याचप्रमाणे, या ट्रेनच्या डब्यांमध्येही हवेच्या दाबावर चालणारे ब्रेक बसविण्यात येतील आणि त्याचे काम सुरू आहे. रुळांमधील अडचणी, संरक्षक भिंत अशी काही कामे पूर्ण करून मिनी ट्रेन पुन्हा सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)