माथूर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) महासंचालकपदी नियुक्ती
By Admin | Published: April 26, 2016 06:41 AM2016-04-26T06:41:10+5:302016-04-26T07:35:19+5:30
आयपीएसच्या १९८१ च्या तुकडीतील अधिकारी सतीश माथूर यांची सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आ
डिप्पी वांकाणी,
मुंबई- आयपीएसच्या १९८१ च्या तुकडीतील अधिकारी सतीश माथूर यांची सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली, या विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजय बर्वे यांच्याकडे राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्तपद सोपविण्यात आले. संजय बर्वे १९८७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. ‘एसीबी’चे प्रमुख होण्यापूर्वी माथूर महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाचे महासंचालक होते.
नॅशनल सिक्युरिटी गार्डमध्ये प्रशिक्षण घेतलेले सतीश माथूर हे महाराष्ट्रातील पहिले अधिकारी असून, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यानंतर ते सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहे. महासंचालक म्हणून त्यांनी विधी व तांत्रिक तसेच पोलीस गृहनिर्माण व कल्याण या विभागाचे महासंचालक म्हणूनही काम केले आहे. त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर असताना एअर इंडियामध्ये तसेच सीबीआयमध्येही काम केले. सीबीआयमध्ये असताना मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट तपासात त्यांचा सहभागा होता. ते काही काळ पुण्याचे आयुक्त होते व मुंबईत वाहतूक पोलीस सहआयुक्त हे पदही त्यांनी भूषवले आहे.
आयपीएस अधिकारी विजय कांबळे गेल्या महिन्यात निवृत्त झाल्यानंतर एसीबीचे महासंचालकपद रिक्त होते. रश्मी शुक्ला यांची या महिन्याच्या प्रारंभी पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी बदली झाल्यामुळे राज्याच्या गुप्तचर विभागाचे आयुक्तपदही रिक्त झाले होते.
राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी नव्या नियुक्त्यांची माहिती ‘लोकमत’ला दिली. राज्यातील युवकांना कट्टरवादापासून परावृत्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेमुळे गुप्तचर विभागाकडे सर्वांचे लक्ष आहे. पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या महासंचालक म्हणून केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांना सरकारकडून अद्याप कार्यमुक्ततेचे आदेश मिळालेले नाहीत. बोरवणकर यांनी नवा पदभार स्वीकारल्यानंतर विधी आणि तांत्रिक विभागाचे महासंचालक तसेच महासंचालक व महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाचे महासंचालक ही दोन पदे रिक्त राहतील. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन या महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत. त्यामुळे सरकारला तिथेही अधिकाऱ्याचाही शोध घ्यावा लागेल.