कलानगरमध्ये साकारतेय ‘मातोश्री-२’
By Admin | Published: March 29, 2017 03:45 AM2017-03-29T03:45:42+5:302017-03-29T03:45:42+5:30
शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे सत्ता केंद्र ठरलेल्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर आता नवीन
मुंबई : शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे सत्ता केंद्र ठरलेल्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर आता नवीन ‘मातोश्री’ इमारत उभारली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या नव्या पिढीसाठी कलानगरमध्येच ‘मातोश्री-२’ ही सहा मजली इमारत उभारत आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे गेली अनेक दशके ‘मातोश्री’ आकर्षणाचे केंद्र बनले. शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान बनलेल्या या मातोश्री निवासस्थानासमोरच ‘मातोश्री-२’ ही वास्तू उभारण्यात येत आहे. तब्बल १० हजार चौरसफुट जागेवर नवीन सहा मजली इमारत उभारण्याचे काम सुरु आहे. मातोश्री-२ मध्ये दोन ट्रीप्लेक्स फ्लॅट्स आणि दोन माळ्याच्या उंचीचे हॉल्स असणार आहेत. प्रत्येक फ्लॅट मध्ये पाच बेडरूम आणि स्टडी रुम असेल. प्रसिद्ध वास्तुविशारद ‘तलाटी अँड पानथकी’ यांनी या मातोश्री-२ चा आराखडा तयार केला आहे.एकेकाळी प्रसिद्ध चित्रकार के.के. हब्बर यांचे इथे वास्तव्य होते. १९९६ साली हेब्बार यांच्या निधनानंतर ही जागा त्यांच्या वारसांकडे गेली. २००७ साली हेब्बार यांच्या वारसदारांनी सुमारे साडेतीन कोटींना ही जागा ‘प्लॅटिनम इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीला विकली.
अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी प्लॅटीनम कंपनीकडून ही जागा विकत घेतली असून त्यासाठी सुमारे ११ कोटी ६० लाख मोजल्याची माहिती सुत्रांनी दिली. जागेची खरेदी करताना ठाकरे कुटुंबीयांनी ५ कोटी ८० लाख रुपये प्लॅटिनमला दिले, तर उर्वरित ५ कोटी ६० लाख इतकी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली आहे. शिवाय मुद्रांक शुल्कापोटी ५८ लाख रुपयेही ठाकरे कुटुंबीयांनी भरले. १७ आॅक्टोबर २०१६ रोजी मुंबई महापालिकेने ठाकरे कुटुंबियांनी बांधकामाची परवानगी दिली आहे. (प्रतिनिधी)
कलानगरवासीयांचा सुटकेचा नि:श्वास
मातोश्री निवासस्थानाचे राजकीय वजन आणि सुरक्षेच्या कारणामुळे कलानगरमधील अन्य रहिवाशांची नेहमीच अडचण होते.
रहिवाशांची ही तक्रार लक्षात घेत नव्या मातोश्री-२ या इमारतीची दुसरी बाजू बीकेसीच्या दिशेने उघडण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेना कार्यकर्त्यांना कलानगरमधील चिंचोळ््या गल्लीला पर्याय मिळणार आहे.