सेना प्रवेशासाठी मातोश्रीवर गर्दी
By admin | Published: January 28, 2017 04:10 AM2017-01-28T04:10:41+5:302017-01-28T04:10:41+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी सर्वपक्षीय इच्छुकांनी मातोश्रीवर गर्दी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी सर्वपक्षीय इच्छुकांनी मातोश्रीवर गर्दी केली. शिवसेना मुंबईतील सर्व २२७ जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कुंपणावरील अन्य पक्षीय नेते व इच्छुकांनी शिवसेनेचे दरवाजे ठोठवायला सुरुवात केली आहे.
मराठी अस्मितेची धरलेली कास आणि युतीच्या राजकारणात भाजपासाठी शिवसेनेने मुंबईतील अन्य भाषिक मतदारसंघांकडे दुर्लक्ष केले होते.
यंदा मात्र अशा ठिकाणीही शिवसेना उमेदवारी देणार असल्याचे निश्चित झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आपल्या पक्षाच्या कामगिरीवर साशंक असणाऱ्या नेते युतीतील शिवसेना आणि भाजपाकडे वळण्याची शक्यता खरी ठरत असून शक्रवारी काँग्रेस आणि सपाच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गुरुदास कामत यांचे कट्टर समर्थक असलेले मालाड पश्चिमेतील काँग्रेसचे माजी नगरसेवक बलदेवसिंग मानको उर्फ बिल्लाजी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. बिल्लाजी यांची कन्या प्रबलीन कौर मानको यांनीही उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला.
तर समाजवादी पक्षाच्या मुंबई युवा विंगच्या अध्यक्षा आणि अबू आझमी यांची निकटवर्तीय नेहा खान यांनी आपल्या मुस्लीम कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश झाला.
शिवसेना, भाजपाच्या या कलगीतुऱ्याचा थेट फटका काँग्रस, राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अन्य पक्षांतून शिवसेना आणि भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)