नाराजांची समजूत ‘मातोश्री’वर !

By admin | Published: September 29, 2016 06:43 AM2016-09-29T06:43:50+5:302016-09-29T06:43:50+5:30

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये मराठा मोर्चाबाबत प्रकाशित व्यंगचित्राच्या निषेधार्थ राजीनामे देणारे बुलडाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर

'Matosree' on the anger of the angry! | नाराजांची समजूत ‘मातोश्री’वर !

नाराजांची समजूत ‘मातोश्री’वर !

Next

मुंबई/बुलडाणा : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये मराठा मोर्चाबाबत प्रकाशित व्यंगचित्राच्या निषेधार्थ राजीनामे देणारे बुलडाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर आणि सिंदखेडराजाचे आमदार शशिकांत खेडेकर यांची समजूत काढण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यश आल्यानंतर या राजीनामा नाट्यावर पडदा पडला.
या राजीनाम्यामुळे शिवसेनेतील वादंग तूर्त मिटला असला तरी मराठा प्रश्नाबाबत यापुढे अतिशय सावध भूमिका घेण्याचे आणि या समाजाला अजिबात न दुखावण्याचे धोरण शिवसेना नेत्यांनी घेण्याचे ठरविले आहे. त्याचाच भाग म्हणून सामना दैनिकातील बातम्या या समाजाच्या विरोधात अजिबात असू नयेत आणि शक्य तितक्या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा द्यावा, असे नेत्यांनी ठरविल्याचे सांगण्यात आले.
खा. जाधव आणि इतर दोन आमदारांना ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावून घेतले. त्या वेळी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई,
पक्षाचे काही मंत्री उपस्थित होते. व्यंगचित्रकाराने आजच्या सामनामध्ये माफी मागितलेली आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता, तुम्ही माझ्याकडे राजीनामे दिलेले असले तरी ते मी स्वीकारणार नाही. शिवाय, ते व्यंगचित्र ही शिवसेनेची स्वप्नातदेखील भूमिका असू शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी तिघांनाही सांगितले.
दरम्यान, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी गुरुवारच्या अंकात माफीनामा द्यावा, अशी मागणी खा. जाधव आणि इतर दोन आमदारांनी या वेळी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या माफीनाम्याबाबत पक्षाच्या इतर नेत्यांकडूनही दबाव असल्याचे समजते.
दरम्यान, व्यंगचित्रकाराने माफी मागितलेली असताना खरे तर या वादावर आता पडदा पडला आहे. पण जे आमच्यावर जळतात आणि ज्यांना महाराष्ट्रात शांतता नको आहे, ते लोक विरोधात बोलत आहेत, असे खा. राऊत यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

ठिकठिकाणी गुन्हे दाखल
सामनातील व्यंगचित्रावर संबंधित व्यंगचित्रकाराने माफीनामा सादर करूनही हा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या विरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
औरंगाबाद येथील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात शिवक्रांती सेनेचे रवींद्र काळे यांनी तक्रार दाखल केली आहे. तर परभणी येथे अ‍ॅड. विष्णू नवले यांच्या तक्र ारीनंतर नानल पेठ पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोलीत मराठा शिवसैनिक सेनेचे विनायक भिसे, तर वसमत येथे शंकर दगडू कदम यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले.

शिवसेनेची स्थापनाच व्यंगचित्रामुळे, पण...
शिवसेनेची स्थापनाच मुळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रांच्या जोरावर केली होती. त्यांची व्यंगचित्रे पाहूनच तेव्हाचा मराठी माणूस पेटून उठत असे. त्यातूनच शिवसेनेची स्थापना झाली होती. स्व. बाळासाहेब ठाकरे यांची अनेक व्यंगचित्रे केवळ बोचरीच नव्हे, तर काही वेळा अनेकांना विखारीही वाटत असत. त्यांनी व्यंगचित्रांसाठी वापरलेल्या कुंचल्यातून तेव्हाचा एकही नेता सुटला नव्हता आणि जवळपास चळवळीवर त्यांनी व्यंगचित्रांद्वारे भाष्य केले होते. मात्र त्याच शिवसेनेला एका व्यंगचित्रामुळे आता अतिशय अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.
एवढेच नव्हे, तर कोणत्याही प्रकरणात दिलगिरी व्यक्त न करणाऱ्या दैनिक सामनाला या वेळी अप्रत्यक्ष का होईना, मराठा समाजाची माफी मागावी लागली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी संबंधित व्यंगचित्राबद्दल माफी मागितली असली, तरी त्यामुळे अनेक व्यंगचित्रकार नाराज झाले आहेत. शिवसेनेने असे करायला नको होते, असे काहींनी बोलून दाखवले.

डिक्शनरीमध्ये दिलगिरी हा शब्द नव्हता
आतापर्यंत शिवसेनेच्या धमक्या व इशाऱ्यांमुळे इतरांना दिलगिरी व्यक्त करावी लागत असे. पण ही वेळ आता शिवसेनेवरच आली, हे काही जुन्या शिवसैनिकांनाच खटकले आहे. स्व. बाळासाहेबांच्या डिक्शनरीमध्ये दिलगिरी हा शब्द नव्हता आणि ते कधी शब्द मागे घेत नसत. शिवाय जातीच्या आधारावर आरक्षणाला त्यांचा कायम विरोध होता. तो त्यांनी कधी लपवून ठेवला नव्हता. असंख्य शिवसैनिक मराठे आहेत, हे लक्षात घेत, मुळात आंदोलनाची अशी टिंगलटवाळी करणे योग्यच नव्हते. पण आधी नको ते केले आणि आता त्याचे परिणाम बराच काळ सहन करावे लागतील, असे काही शिवसैनिकांनी बोलून दाखवले.

खा. प्रतापराव जाधव व आ.डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासोबत मी आज मातोश्रीवर गेलो होतो. तेथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. व्यंगचित्रकाराने माफी मागितलेली असल्याने आम्ही राजीनामे मागे घेतले आहेत.- आ. संजय रायमूलकर, मेहकर

Web Title: 'Matosree' on the anger of the angry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.