‘मातोश्री’ची दानपेटी गुरुदक्षिणेच्या प्रतीक्षेत!
By admin | Published: July 10, 2017 06:00 AM2017-07-10T06:00:06+5:302017-07-10T06:00:06+5:30
गुरूपौर्णिमनिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशिर्वाद घेण्यासाठी दरवर्षी ‘मातोश्री’वर उसळणारी गर्दी आता ओसरली
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुरूपौर्णिमनिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशिर्वाद घेण्यासाठी दरवर्षी ‘मातोश्री’वर उसळणारी गर्दी आता ओसरली असून काही मोजके शिवसैनिक वगळता मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. परिणामी, दानपेटी रितीच राहिली.
बाळासाहेब आणि शिवसैनिकांमध्ये गुरु-शिष्याचे नाते होते. त्यामुळे
दरवर्षी गुरूपौर्णिमेनिमित्त वांद्रे येथील
ठाकरे कुटुंबीयांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’वर सामान्य शिवसैनिकांपासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत अनेकांची तोबा
गर्दी उसळत असे. मुंबईसह राज्यभरातील शिवसैनिक मातोश्रीवर हजेरी लावत. बाळासाहेबांचा हात आपल्या
डोक्यावर यावा, यासाठी रेटारेटीही
होत असे.
>मोजकेच शिवसैनिक आले
मातोश्रीबाहेर गर्दी होण्याचे हे चित्र इतिहासजमा झाल्याचे आज पाहायला मिळाले. राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्ता असतानाही सेनेच्या मंत्र्यांसह, खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी ‘मातोश्री’कडे चक्क पाठ फिरवली. काही मोजके शिवसैनिक हातात पुष्पगुच्छ घेऊन आल्याचे दिसले.
गुरु पौर्णिमेला ‘मातोश्री’बाहेर एक पेटी ठेवली जाते.
गुरु दक्षिणा म्हणून त्या पेटीत शिवसैनिक पैसे टाकतात. ते पैसे पक्षकार्यासाठी वापरले जातात. यंदा ही पेटी गुरूदक्षिणेनं ओसंडून वाहिल, अशी अपेक्षा होती. मात्र, शिष्यांनीच पाठ फिरवल्याने दानपेटीही ‘दक्षिणे’च्या प्रतिक्षेतच राहिली.