माथाडींचा कडकडीत बंद

By Admin | Published: March 17, 2015 01:25 AM2015-03-17T01:25:43+5:302015-03-17T01:25:43+5:30

राज्यव्यापी बंदमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा - बटाटा, मसाला, धान्य, फळ, भाजी मार्केटमधील व्यवहार दिवसभर ठप्प होते.

Matthi's stiffness stopped | माथाडींचा कडकडीत बंद

माथाडींचा कडकडीत बंद

googlenewsNext

नवी मुंबई : राज्य शासनाच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी माथाडी कामगारांनी सोमवारी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा - बटाटा, मसाला, धान्य, फळ, भाजी मार्केटमधील व्यवहार दिवसभर ठप्प होते. कामगार कायद्यात बदल केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माथाडी नेत्यांनी या वेळी दिला.
शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने मेक इन महाराष्ट्र व डिजिटल इंडिया मिशन राबविण्यासाठी कामगार नियम व कायद्यात बदल करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. माथाडीसह इतर अनेक कामगार हिताच्या कायद्यांमध्ये बदल करण्याचा व काही कायदे रद्द करण्याचा विचार सुरू झाल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांच्यासह हमाल पंचायतचे बाबा आढाव, बाबूराव रामिष्टे व इतर कामगार नेत्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. कामगारविरोधी धोरण राबविणाऱ्या शासनाचा कामगारांनी तीव्र शब्दांत निषेध केला. कळंबोलीमधील स्टील मार्केट, मशीद बंदर, ट्रान्सपोर्ट, रेल्वे धक्के व इतर मार्केट बंद ठेवण्यात आली होती. पुण्यामधील गुलटेकडी, नाशिक, उल्हासनगर व राज्यातील इतर शहरातील बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)

माथाडी कामगारांचा
बंद पूर्ण यशस्वी
पुणे : माथाडी कायद्याची अंमलबजावणी आणि इतर मागण्यांसाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ आणि अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती यांच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला होता. मुंबई आणि नाशिक परिसरात प्रभाव असलेल्या अण्णा पाटीलप्रणीत महाराष्ट्र माथाडी आणि जनकल्याण कामगार युनियनने या बंदला पाठिंबा दिला होता. माथाडी कामगारांचा हा पहिलाच राज्यव्यापी संप होता.

माथाडी कामगारांना बेरोजगार करण्याचे कारस्थान सुरू आहे. परिस्थिती न बदलल्यास आंदोलन करण्यात येईल.
- आमदार शशिकांत शिंदे,
माथाडी नेते

यानंतरही शासनाची कामगारविरोधी भूमिका कायम राहिल्यास सर्व संघटनांना विश्वासात घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- आमदार नरेंद्र पाटील, माथाडी नेते

Web Title: Matthi's stiffness stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.