मौलाना आझाद सभागृहाची दुरवस्था
By admin | Published: February 27, 2017 12:51 AM2017-02-27T00:51:27+5:302017-02-27T00:51:27+5:30
महापालिकेने सन २००० मध्ये कोरेगाव पार्क येथे बांधलेल्या मौलाना अबुल कलाम सभागृहाची निगराणीअभावी दुरवस्था झाली आहे.
पुणे : महापालिकेने सन २००० मध्ये कोरेगाव पार्क येथे बांधलेल्या मौलाना अबुल कलाम सभागृहाची निगराणीअभावी दुरवस्था झाली आहे. उत्तम बांधकामाचा नमुना असलेली ही वास्तू वापराअभावी पडीक झाली असून, लक्ष दिले गेले नाही, तर थोड्याच कालावधीत ती वापरासाठी कायमची बंद होण्याची शक्यता आहे.
येरवडा येथील पुलावरून पुणे शहराकडे येताना पूल ओलांडला की, लगेचच डाव्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याच्या अखेरीस ही वास्तू आहे. आकर्षक कमानी, त्यावर बारिक नक्षीकाम, आत पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर दोन मोठी सभागृह व एका बाजूला मोठे कलादालन, भिंतीवर आतील व बाहेरच्या बाजूनेही चित्र लावण्यासाठी तयार केलेल्या फ्रेम्स अशी या वास्तूची रचना आहे. कमानींमुळे संपूर्ण वास्तूला वेगळाच कलात्मक बाज आला आहे. त्याशिवाय संपूर्ण वास्तूूच्या भोवती बागही केली आहे. त्याच्या भोवताली पुन्हा दाट वृक्षराजी आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी म्हणून ही वास्तू महापालिकेने बांधली; मात्र देखभालीअभावी तिची दुरवस्था झाली आहे. महापालिका निवडणुकीतील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीतील प्रभागांची मतमोजणी या वास्तूत झाली. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पहिल्या मजल्यावरील सभागृहाची स्वच्छता करण्यात आली होती; मात्र तरीही संपूर्ण वास्तूला आलेली अवकळा पहिल्या दृष्टिक्षेपातच लक्षात येत होती. सरकारी अधिकाऱ्यांसह बहुतेकांनी त्याबद्दल हळहळ व्यक्त केली.
या परिसरात अनेक स्वयंसेवी संस्था, संघटनांचे कार्यक्रम होत असतात. त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या सभागृहाची आवश्यकता होती, त्यामुळेच महापालिकेने ते बांधले, मात्र आता त्याची देखभाल दुरुस्ती होत नसल्यामुळे तेही बंद अवस्थेतच आहे. ते दुरुस्त करून वापरासाठी देण्याची गरज आहे, असे परिसरातील रहिवाशांचे मत आहे; मात्र वारंवार मागणी केल्यानंतरही त्याकडे लक्ष दिले जात नाही, अशी त्यांची
तक्रार आहे. (प्रतिनिधी)
>दुरुस्तीसाठी महापालिकेकडे नाही वेळ
वास्तूच्या भोवताली तयार केलेल्या बागेकडे दुर्लक्ष झालेले दिसते. स्वच्छतागृहाला दारे नाही. वीजपुरवठा नाही. मतमोजणीसाठी म्हणून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. अनेक ठिकाणचा रंग निघाला आहे. सगळीकडे जाळीजळमटे आहेत. दुसऱ्या मजल्यावरील सभागृह; तसेच कलादालन कुलूप व त्यावर सील लावून बंद करण्यात आले आहे. त्याचा कधी वापरच होत नसल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. अनेक महिन्यांपासून संपूर्ण सभागृहच बंद आहे, महापालिकेकडे कार्यक्रमासाठी मागितले की, ते बंद असल्याचे सांगण्यात येते, अशी माहिती त्यांनी दिली.
>सभागृहाचा वापर होत नाही ही वस्तुस्थिती आहे; मात्र त्याच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. ते काम सुरू असल्यामुळेच मागील ६ महिने सभागृह बंद ठेवण्यात आले आहे. मतमोजणी होणार असल्यामुळे ते काम थांबले. आता ते पुन्हा सुरू होईल. सभागृह कौटुंबिक कारणांसाठी मागण्यात येते. महापालिका नियमात तशी तरतूद नसल्यामुळे देता येत नाही. चर्चासत्र, परिसंवाद यासाठी ते देण्यात येईल. कलादालनाचा वापर सुरू करण्याचा प्रयत्न आाहे.
- भारत कुमावत,
व्यवस्थापक, महापालिका सांस्कृतिक सभागृह