माउलीभक्तांचा मेळा मल्हारनगरीत विसावला
By admin | Published: July 4, 2016 04:32 AM2016-07-04T04:32:32+5:302016-07-04T04:32:32+5:30
जेजुरीच्या मल्हारी मार्तंड नगरीत बेलभंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करीत श्री संतशिरोमणी ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याने रविवारी सायंकाळी प्रवेश केला.
जेजुरी : महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या जेजुरीच्या मल्हारी मार्तंड नगरीत बेलभंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करीत श्री संतशिरोमणी ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याने रविवारी सायंकाळी प्रवेश केला. टाळमृदंगाच्या गजराने जेजुरीनगरी दुमदुमली. वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत गडकोटात ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ आणि ‘ज्ञानोबा माउली’च्या जयघोषात दर्शन घेतले.संत सोपानकाकांच्या सासवडनगरीत माउलींची नित्य महापूजा झाल्यानंतर पालखी सोहळ्याने सकाळी जेजुरीकडे प्रस्थान केले. बोरवकेमळा येथील न्याहारी, पुढे शिवरी येथील दुपारची विश्रांती, त्याचबरोबर साकुर्डे येथील विसावा उरकून सायंकाळी मजल-दरमजल करीत सोहळा जेजुरीत पोहोचला.
तुकारामांच्या ओवीच्या सुरात दिंडीकरी वैष्णव झपझप पावले टाकीत खंडोबाची जेजुरी जवळ करीत होता. वारकरी नाचत-गात जेजुरीकडे येत होते. थंड व आल्हाददायक वातावरणातही रस्त्यात शेतकरीवर्गाने वारकऱ्यांसाठी आणलेली भाजी-भाकर वैष्णवांना मायेची ऊब देत होती. वरवंडमध्ये तुकोबारायांचे आगमन
वरवंड : टाळ-मृदंगाच्या गजरात व विठुरायाच्या जयघोषात श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे रविवारी येथे मोठ्या उत्साहात भरपावसात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थ गावाच्या वेशीवर मोठ्या संख्येने हजर होते. ग्रामस्थांनी टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
वरवंडमध्ये जून महिना अक्षरश: कोरडा गेल्याने शेतकरी चिंंतित होता; मात्र पालखीचे आगमन होताच पावसालाही सुरुवात झाली. या वेळी वारकरी नाचत-गात जेजुरीकडे येत होते.