माऊलींची पालखी अलंकापुरीत परतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2016 08:34 PM2016-07-29T20:34:08+5:302016-07-29T20:36:03+5:30
तब्बल एका महिन्याचा पायी प्रवास करून पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन आज अलंकापुरीत दाखल झालेल्या माऊलींच्या पालखीचे आळंदीकरांनी जंगी स्वागत केले.
ऑनलाइन लोकमत
आळंदी, दि. २९ : तब्बल एका महिन्याचा पायी प्रवास करून पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन आज अलंकापुरीत दाखल झालेल्या माऊलींच्या पालखीचे आळंदीकरांनी जंगी स्वागत केले.
पालखीसह लाखो वारकरी व भाविकांच्या सोबत टाळ-मृदंगाचा गजर करीत संतजनांचा मेळा आज अलंकापुरीत दाखल होणार असल्यामुळे पालखीमार्गावर रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. प्रदक्षिणामार्गावर, महाद्वार चौक, नगरपालिका चौकात रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. नागरिकांच्या वतीने माऊलीच्या पालखीवर फुलांची उधळण केली जात होती.
येथील राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्थांच्या वतीने विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी अल्पोपाहाराचे मोफत वाटप करण्यात येत होते. नगर परिषदेच्या वतीने पालखीमार्गावर औषधफवारणी करून रस्ते स्वच्छ करण्यात आले होते. पालखी विश्रांतवाडी परिसरात आल्याचा निरोप आळंदी मार्गावरील भाविकांना मिळताच त्यांनी पालखीचे पायी जाऊन स्वागत केले.
पोलीस प्रशासनाच्या वतीने मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालखी नगरपालिका चौक, प्रदक्षिणामार्ग, इंद्रायणी घाट यामार्गे महाद्वारातून मंदिरात विसावली. मंदिरात प्रवेश करताना पालखीसोबत पुढे २७ व मागे २० अशा मानाच्या ४७ दिंड्या होत्या. पालखीचे मंदिर परिसरात आगमन होताच तेथेही भाविकांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर पालखीची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली.