माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 05:43 AM2018-07-18T05:43:09+5:302018-07-18T05:43:34+5:30
विठुरायाच्या भेटीने आतुर होऊन पायी निघालेल्या लक्षावधी वैष्णवांचा मेळा मंगळवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात पोहोचला.
धर्मपुरी (जि. सोलापूर) : विठुरायाच्या भेटीने आतुर होऊन पायी निघालेल्या लक्षावधी वैष्णवांचा मेळा मंगळवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात पोहोचला. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा धर्मपुरी कालव्यावर पोहोचल्यावर जिल्हा प्रशासनाने केलेले जंगी स्वागत, बंदोबस्त व सुव्यवस्थेमुळे वारकरी भारावले. पालखी सोहळ्याचा नातेपुते येथे मुक्काम आहे.
सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवरील धर्मपुरी गावाजवळील कालव्यालगत प्रशासनाच्या वतीने शामियाना उभारण्यात आला होता. सकाळी संत ज्ञानेश्वर माऊलींचा नगारा पोहोचला. त्यापाठोपाठ माऊलींचे अश्व पोहोचले. रथापुढे चालणाऱ्या मानाच्या २७ दिंड्यांनंतर माऊलींचा रथ पोहोचला.
सकाळी ६ वाजता बरड तळावरील मुक्कामानंतर सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ झाला. फलटण ते बरड हा संपूर्ण प्रवासही पावसाच्या धारा झेलतच झाला होता. तरीही वारकºयांचा उत्साह कायम होता. बरडहून प्रस्थानानंतर साधूबुवांचा ओढा येथे परंपरेनुसार सकाळचा विसावा झाला. त्यानंतर सोहळा सकाळी १० वाजता पुढे
निघाला.
>तुकोबारायांच्या पालखीचे बावड्यात स्वागत शाही
बावडा (जि. पुणे) : ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात बावडानगरीत दुपारच्या विसाव्यासाठी दाखल झालेल्या संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराजांच्या पालखीचे मंगळवारी तोफांच्या सलामीत शाही स्वागत करण्यात आले.
सोमवारचा इंदापूरचा मुक्काम आटोपून वडापुरी, रामवाडी, सुरवड, वकीलवस्ती आदी ठिकाणचा पाहुणचार घेऊन पालखी दुपारी तीन वाजता येथे दाखल झाली. ब्रह्मर्र्षी हरिभाऊ तोरणे गुरुजी चौकात पालखी येताच हजारो भक्तगणांनी दर्शन घेतले. सायंकाळी पाच वाजता पालखीचा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असणाºया सराटी गावाकडे प्रस्थान झाले.
>भक्तनिवासात १२०३ भाविकांची सोय
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुमारे ७० कोटी रुपये खर्चून पंढरपुरात येणाºया भाविकांच्या सोयीसाठी सुसज्ज असे भक्तनिवास उभाण्यात आले आहे.आषाढी वारीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता होती, पण काही काम अपूर्ण आहे़
>सोलापूरकर नतमस्तक
सोलापूर : मागील ३३ दिवसांपासूनचा प्रवास करीत आलेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचे टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘गण गण गणात बोते़़़’चा जयघोष करीत उपलप मंगल कार्यालयात आगमन झाले़ उपलप कुटुंबाने प्रथेप्रमाणे पालखीचे स्वागत करून अन्नदानाची सेवा बजावली़
>संत एकनाथ पालखीचे जिल्ह्यात स्वागत
माढा : पैठणहून निघालेल्या संत एकनाथ महाराज पालखीचे मंगळवारी तालुक्यातील मुंगशीत भक्तिमय वातावरणात आगमन झाले. तहसीलदार सदाशिव पडदुणे, गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी यांनी पालखीचे दर्शन घेत स्वागत केले.
>पंढरीवर ‘सीसीटीव्ही कॅमेरा’चा वॉच
पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळ्यादरम्यान कोणत्याही ठिकाणी काही अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास तो तत्काळ थांबवता यावा, यासाठी मंदिर व पोलीस प्रशासनाकडून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व शहरात एकूण १५३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ हेच सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण आषाढी वारी सोहळ्यावर लक्ष ठेवणार आहेत़