पंढरपूर वारी २०१९ : माऊलींची पालखी आज करणार धर्मपुरी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 06:17 PM2019-07-05T18:17:47+5:302019-07-05T18:24:57+5:30
टाळ मृदुगांच्या तालात, उभा रिंगण सोहळ्याची ऊर्जा घेऊन जवळपास पंढरी मार्गाचा अर्धा टप्पा पार केला आहे.
- अमोल अवचिते-
बरड : जंबुया व्दीपामाजी एक पंढरपूर गांव ! धर्माचेनगर देखा विठो पाटील त्याचें नाव! चला जाऊं तया ठायी! असे म्हणत फलटण मुक्कामानंतर सकाळी साडे सहा वाजता माऊलींची पालखीे निघाली. सकाळी विडणी येथे न्याहरी, पिंप्रद येथे दुपारचे भोजन, वाजेगाव, निंबळक फाटा येथे विसावा घेऊन पालखी सातारा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामाला बरड येथे संध्याकाळी सहाच्या सुमारास पोहोचली. आज शनिवारी दुपारी पालखी धर्मपुरी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन पंढरीकडे वाटचाल करणारा पालखी सोहळा पुणे जिल्हाचे अंतर पार करत , सातारा जिल्ह्यात शेवटच्या मुक्कामी विसावला. आता फक्त वैष्णवांना विठ्ठल भेटीची उत्सुकता लागली आहे. टाळ मृदुगांच्या तालात, उभा रिंगण सोहळ्याची ऊर्जा घेऊन जवळपास पंढरी मार्गाचा अर्धा टप्पा पार केला आहे. बरड गावच्या मुक्कामानंतर वैष्णवांना कधी एकदा धमार्पुरीत प्रेवश करेल असे झाले आहे.
जस जसे अंतर पार केले जात आहे, तसा पालखी सोहळा रंगत असून वारकऱ्यांचा उत्साह वाढत आहे. फलटण मार्गावर पावसाने हुलकावणी दिली होती. मात्र बरडगावकडे मार्गस्थ होत असताना पावसाची रिमझिम सुर झाल्याने वारकरी सुखावले.
फलटण येथील स्थळावर झालेल्या समाज आरतीवेळी वारकऱ्यांना मार्गात वाहतुकीचे नियम पाळण्याची सूचना करण्यात आली. पास असेलेल्या वाहनांनी पुढे जाण्याची घाई केल्याने वाहतूक कोंडी होत असल्याची सूचना करून वाहने शिस्तीत चालवण्यास सांगितले. चैतन्याचे वातावरण असुन भजनात वारकरी नाचत आहेत. उडीचे खेळ खेळले जात होते. आज दुपारनंतर माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करुन नातेपुते येथे विसावणार आहे.