माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान
By admin | Published: June 17, 2017 03:34 AM2017-06-17T03:34:05+5:302017-06-17T07:22:19+5:30
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास जेष्ठ वैद्य अष्टमीला पहाटे चारपासून प्रारंभ होणार आहे. विठूमाऊलींची आस लागलेले
लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास जेष्ठ वैद्य अष्टमीला पहाटे चारपासून प्रारंभ होणार आहे. विठूमाऊलींची आस लागलेले लाखो वैष्णव उद्यापासून (दि.१७) माऊलींच्या पालखीसह पंढरीच्या वाटेवर प्रस्थान ठेवणार आहेत. आनंददायी असणाऱ्या वैभवी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होऊन याची देही अनुभवण्यासाठी राज्यभरातून असंख्य वारकऱ्यांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल झाली आहे. सारे भाविक प्रस्थान सोहळ्याच्या तयारीत मग्न आहेत.
श्री संतश्रेष्ठ जगतगुरु ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून भरउन्हात वारकऱ्यांच्या दर्शनबारीत रांगा लागल्या आहेत. पासव्यतिरिक्त भाविकांना महाद्वारातून प्रवेशास मज्जाव करण्यात आल्याने मंदिराच्या नवीन दर्शनबारीतून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे.
इंद्रायणीकाठ गजबजला...!
भगव्या पताका, टाळ - मृदुंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामांचा गजर करीत दिंडी व पालखीसमवेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने वारकरी आळंदीनगरीत दाखल झाल्याने पूर्वसंध्येला पवित्र इंद्रायणीकाठ वारकऱ्यांनी गजबजून निघाला आहे. इंद्रायणीतीरी दिवसभर फेर, फुगड्या, नामघोष करून वारकरी प्रस्थानपूर्वीचा आनंद मनसोक्त लुटत आहेत. टाळ मृदुंगाचा निनाद व ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाने संपूर्ण अलंकापुरी वारकऱ्यांनी दुमदुमून सोडली आहे.
आळंदीकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर दिंड्यांचे वास्तव्य आहे. पायी येणाऱ्या दिंड्यांना गावोगावी चहा, पाणी, फराळ, जेवणाची व्यवस्था केली जात आहे. आळंदीत दाखल झालेल्या दिंड्यांनी शहरात ठिकठिकाणी राहुट्या उभारल्या असून, त्यामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, ज्ञानेश्वरीच्या ओवींचे पठण करण्यात वारकरी दंग झाले आहेत. धर्मशाळा, विवाह कार्यालयांमध्ये माउलींचा नामघोष सुरु आहे.
आळंदीचे रस्ते, छोटी-मोठी दुकाने, हॉटेल वारकऱ्यांनी भरली असून पायीवारी प्रस्थानापूर्वी वारीदरम्यान लागणारी आवश्यक सामुग्री वारकरी खरेदी करत आहेत. चप्पल, बूट, कपडे, दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करून व्यवस्थितपणे त्या पिशवीत भरून ठेवल्या जात आहेत. वारीला प्रस्थान ठेवण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने वारकरी भक्तीचा आनंद मनसोक्त लुटत आहेत.
असा असेल प्रस्थान सोहळा...
शनिवारी पहाटे ४ वा. घंटानाद. ४.१५ काकडा. पहाटे ४.१५ ते ५.३० पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती. ५ ते सकाळी ९ पर्यंत भक्तांच्या महापूजा
व समाधी दर्शन.
सकाळी ९ ते १२ पर्यंत भाविकांना समाधीस्थळाचे दर्शन व वीणा मंडपात कीर्तन. दुपारी १२ ते १२.३० गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व श्रींना महानैवेद्य. दुपारी १२.३० ते २.३० पर्यंत भाविकांना समाधीचे दर्शन.
दुपारी २.३० ते ३ वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मानाच्या ४७ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून प्रवेश. दरम्यान
श्रींना पोशाख घालण्यात येईल.
दुपारी ४ वाजता मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात.
श्रीगुरु हैबतबाबा यांच्या तर्फे श्रींची आरती. त्यानंतर संस्थांची आरती, नारळ प्रसाद व विधिवत मानपानाचा कार्यक्रम.
माऊलींचे मानाचे दोन्ही अश्व मंदिरात प्रवेश करतील. विणामंडपात पालखीमध्ये श्रींच्या चल पादुका प्राणप्रतिष्ठापित
होईल. दरम्यान संस्थांतर्फे मानकऱ्यांना मानाची पागोटी वाटप करण्यात येईल.
नंतर पालखी महाद्वारातून प्रस्थान ठेऊन प्रदक्षिणा मार्गाने हा सोहळा आजोळघरी (दर्शन मंडप इमारत) पहिल्या मुक्कामी स्थिरावेल.
रात्री ११ ते ४.३० जागर.
माऊलींचे अश्व आळंदीत दाखल
अंकली ते आळंदी असा ११ दिवसांचा प्रवास
पूर्ण करून माउलींचे अश्व शुक्रवारी (दि.१६) दुपारी आळंदीत दाखल झाले.
आळंदीच्या वेशीवर श्रींच्या अश्वांचे प्रथा परंपरेनुसार देवस्थानाने स्वागत करून केले. या प्रसंगी भाविकांनी माउलींच्या अश्वांना स्पर्श करून दर्शन घेतले.
माऊलींच्या चरणी पावसाचीही हजेरी
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पावसाने आळंदीत हजेरी लावली. त्यामुळे पायीवारीसाठी अलंकापुरीत दाखल झालेल्या वारकऱ्यांची त्रेधा उडाली. मात्र, पावसाच्या सरी अंगावर झेलत वारकरी दर्शनरांगेतून मंदिरात जात होते.
आषाढी पायीवारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक भक्त आळंदीत दाखल झाल्याने संपूर्ण शहरासह पवित्र इंद्रायणीचा परिसर हरिनामाने दुमदुमून गेला आहे.
माउलींचा पायीवारी प्रस्थान सोहळा उद्या (दि.१७) सायंकाळी चारला होणार आहे.
प्रस्थानपूर्वीची जय्यत तयारी देवस्थान, पोलिस प्रशासन, नगर परिषद व प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असून, आता प्रत्येकाला वेध लागले आहेत ते फक्त माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे.