मुंबईतील महाविद्यालयांना 31 जुलैपर्यंत सुट्टी, मुंबई विद्यापीठाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 07:12 PM2017-07-27T19:12:04+5:302017-07-27T19:12:04+5:30
मुंबई विद्यापीठाचा अनागोंदी कारभारामुळे मुंबईतील महाविद्यालयांना 31 जुलैपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन असेसमेंटसाठी मुंबईतील लॉ, आर्ट्स आणि कॉमर्सच्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची सुट्टी वाढवली आहे.
मुंबई, दि. 27 - मुंबई विद्यापीठाचा अनागोंदी कारभारामुळे मुंबईतील महाविद्यालयांना 31 जुलैपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन असेसमेंटसाठी मुंबईतील लॉ, आर्ट्स आणि कॉमर्सच्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची सुट्टी वाढवली आहे.
मुंबई विद्यापीठात ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीतला गोंधळ अजूनही सुरूच आहे. निकाल उशिरा लागत असल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे 31 जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी कंबर कसली असून, बैठकांवर बैठकांचे आयोजन सध्या विद्यापीठात सुरु असल्याचे समजते.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकर जाहीर व्हावेत म्हणून कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या संकल्पनेतून ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणी यंदापासून सुरू करण्यात आली आहे. पण, ही प्रक्रिया सुरू करतानाच अनेक प्रश्न निर्माण झाले होते. निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने दोनदा राबवावी लागली. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी उशिरा सुरू झाली. आता त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या करिअरवर होताना दिसून आले. दरम्यान, जून महिना संपल्यावरही मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर झाले नसल्याने राज्यपालांनी जातीने या प्रकरणात लक्ष घातले. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी आता मुंबई विद्यापीठ वेगाने कामाला लागले आहे.