अभिषेक घोसाळकरांवरच पिस्तुलीतील गोळ्या संपवल्या, मॉरिसने स्वत:वर कुठून झाडल्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 04:33 PM2024-02-09T16:33:07+5:302024-02-09T16:33:26+5:30
घोसाळकर हे बाहेर जाऊया आणि सर्वांसमोर बोलुया असे म्हणत होते. त्यांनी समोर टेबलवरील त्यांचे तीन मोबाईल हातात घेतले व उठले. तेवढ्यात गोळ्या झाडल्या...
ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या मुलाची काल रात्री फेसबुक लाईव्हमध्ये हत्या करण्यात आली होती. अभिषेक घोसाळकर यांच्यावर काल पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. मॉरिस नरोन्हा याने थंड डोक्याने कट रचून ही हत्या केली होती. यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडल्या होत्या. परंतु घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर त्याच्या पिस्तुलमधील गोळ्या संपल्या होत्या, मग त्याने स्वत:वर कशा गोळ्या झाडून घेतल्या, असा सवाल उपस्थित होत होता.
घोसाळकर हे बाहेर जाऊया आणि सर्वांसमोर बोलुया असे म्हणत होते. त्यांनी समोर टेबलवरील त्यांचे तीन मोबाईल हातात घेतले व उठले. पुढे पाऊल टाकतात तोच त्यांच्यावर समोरून पहिली गोळी झाडली गेली. ती त्यांच्या छातीच्या मधोमध लागली. दुसरी गोळी ते वाचवायला गेले ती पाठीत लागली. तिसरी, चौथी गोळी देखील लागली. पाचवी गोळी न लागताच गेली.
यानंतरही घोसाळकर हे तिथून बाहेर पडले. परंतु, त्यांच्या हृदय आणि फुफ्फुसाच्या मधोमध गोळ्या लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव सुरु झाला, यामुळे त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. या काळात मॉरिसच्या बंदुकीतीच गोळ्या संपल्या होत्या. त्याने आणखी गोळ्यांची तयारी करून ठेवलेली होती. पोटमाळ्यावर जात लगेचच त्याने बंदुकीत गोळ्या भरल्या आणि स्वत:वर झाडल्या.
घोसाळकर यांच्यासोबत त्याचे वाद सुरु होते. एका प्रकरणात त्याला तुरुंगाची हवाही खावी लागली होती. घोसाळकर हेच त्यासाठी कारणीभूत आहेत, असा त्याचा समज होता. या रागातून तो तुरुंगातून बाहेर आल्यावर पत्नीला कायम मी त्या घोसाळकरला सोडणार नाही, संपविणार असेच सांगत होता.