मावळ गोळीबार प्रकरणाची पुन्हा चौकशी - हायकोर्टाचा दणका
By admin | Published: April 16, 2015 02:52 PM2015-04-16T14:52:25+5:302015-04-16T14:59:28+5:30
मावळ गोळीबारात संदीप कर्णिक यांच्या गोळीनेच कांताबाई ठाकर या महिलेचा मृ्त्यू झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केल्यानंतर हायकोर्टाने या घटनेची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - मावळ गोळीबार प्रकरणी पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप कर्णिक गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. संदीप कर्णिक यांच्या गोळीनेच कांताबाई ठाकर या महिलेचा मृ्त्यू झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केल्यानंतर हायकोर्टाने या घटनेची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मावळ गोळीबाराप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली असून गुरुवारी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्ते खंडेलवाल यांनी कोर्टासमोर बॅलेस्टिक अहवाल सादर केला. कांताबाई ठाकर या महिलेचा मृत्यू संदीप कर्णिक यांच्या गोळीनेच झाला होता असे या बॅलेस्टिक अहवालातून समोर आले आहे. याशिवाय कांतीबाई ठाकर या उताराच्या दिशेने धावत गेल्या होत्या व त्यादिशेने संदीप कर्णिक यांनीच गोळीबार केला होता असा आरोप पोलिसांनी केला. तपासात या अहवालाची दखल का घेतली नाही असा सवाल उपस्थित करत हायकोर्टाने राज्य सरकारला गोळीबार प्रकरणाची पुन्हा चौकशी करुन संदीप कर्णिक यांच्यावर योग्य कारवाई करा असे सुनावले आहे.
९ ऑगस्ट २०११ रोजी मुंबई पुणे महामार्गावर भारतीय किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी आंदोलन केले होते. पवना धरणातील पाणी पिंपरी चिंचवड महापालिकेला देण्यास शेतक-यांचा विरोध होता. या आंदोलनाला शिवसेना, आरपीआय व भाजपा या पक्षांचाही पाठिंबा होता. आंदोलन करणा-या शेतक-यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात तिघा शेतक-यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये कांताबाई ठाकर या महिलेचाही समावेश होता. संदीप कर्णिक हे त्यावेळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक होते.