मावळात चोरांची दहशत

By admin | Published: March 1, 2017 12:48 AM2017-03-01T00:48:04+5:302017-03-01T00:48:04+5:30

तालुक्यातील प्रमुख शहरांप्रमाणेच नाणे, पवन व अंदर मावळातील दुर्गम भागातही चोर घुसल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

Mavalal Thieves Panic | मावळात चोरांची दहशत

मावळात चोरांची दहशत

Next


कामशेत : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोर आल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, तालुक्यातील प्रमुख शहरांप्रमाणेच नाणे, पवन व अंदर मावळातील दुर्गम भागातही चोर घुसल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यात कोठेही चोरी झाल्याची नोंद पोलीस स्टेशनला नसली, तरी अनेक नागरिकांनी या चोरांना पाहिले असल्याचे बोलले जात आहे. शिवाय काही ठिकाणी या चोरांनी नागरिकांवर हल्ला केल्याची चर्चाही आहे.
मावळात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात चोरांची मोठी दहशत पसरली असून, रोज नवनवीन घटना कानी पडत असल्याने, तसेच एकही चोर पोलिसांच्या हाती येत नसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत चोर आल्याच्या केवळ अफवा असून, त्यांवर कोणी विश्वास ठेवू नका अशी उत्तरे पोलिसांकडून मिळत आहेत; तर आम्ही
स्वत:च्या डोळ्यांनी चोर पाहिले असल्याचे काही नागरिक सांगत आहेत. त्यामुळे परिसरात संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. अनेकांना अजूनही चोरांच्या अफवाच वाटत असून अनेकजण छातीठोक चोर असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे चोर आहेत का नाहीत हा नागरिकांचा गोंधळ होत आहे.
मावळात अज्ञात चोरांचा सुळसुळाट झाला असून, नागरिकांच्या घरांवर दगड मारणे, परिसरातून अचानक गायब होणे अशा घटना घडत आहेत. याचप्रमाणे पवन मावळातील वारू गावच्या रहिवासी सीताबाई रामचंद्र निंबळे यांना कोथुर्णे गावच्या हद्दीत अज्ञात चोरट्यांकडून मारहाण झाली. तसेच नाणे मावळातील साई गावचे बाळू पिंगळे दुपारी १२ ते १ सुमारास शेतावर गेले असताना दोन अज्ञात चोरांनी त्यांना मारहाण केली. ते कसे बसे त्यांच्या तावडीतून सुटले; पण भरपूर मुकामार लागला आहे. या दोन चोरांनी
अंगात बनियन व बर्मुडा चड्डी घातलेली होती. तसेच त्यांच्याकडे पाठीवरची बॅग होती, असे गावकऱ्यांनी सांगितले. याशिवाय कामशेत शहराजवळील वडिवळे गावतही सोमवारी चोर आल्याचे कळाले असून, संपूर्ण रात्र नागरिकांनी गस्तीसाठी जागून घालवली.
कामशेतलाही काही दिवसांपासून चोर आल्याच्या घटना घडत असून, मावळातील प्रत्येक भागात नागरिक व तरुणवर्ग गस्त घालताना दिसत
आहे. त्याचप्रमाणे पोलिसांचीही रात्रीची पेट्रोलिंग सुरू असून, अद्याप एकही चोर हाती न आल्याने नागरिक संभ्रमात आहेत. (वार्ताहर)
>चांदखेड : सोशल मीडियावर फिरत असलेल्या चोरांच्या बातम्यांमुळे चांदखेड परिसरातील कुसगाव, पाचाणे, पुसाणे , दिवड, ओवळे ,आढले बु॥, आढले खु॥ ,डोणे या गावांमध्ये घबराट पसरली आहे. गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमधून चोरांच्याच चर्चा ऐकायला मिळत आहे. रानांमध्ये वस्तीवर राहत असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे प्रमाण जास्त असून, तीन हजार चोरांची टोळी असून, अमुक गावामध्ये काल चोरी झाली, अशाप्रकारे नागरिकांच्या चर्चा आहेत. तसेच यापूर्वी या गावांमध्ये कामगारांना अडवून लूटमारीच्या घटना, तसेच घरफोडीच्या घटना घडलेल्या असल्यामुळे या भागात पोलीस पेट्रोलिंग सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडेचे पोलीस निरीक्षक मुकुटराव पाटील, सहायक फौजदार सूर्यकांत भागवत यांनी परिसरातील गावात जाऊन चोर असल्याच्या अफवा असून आतापर्यंत कोठेही अशाप्रकारे घटना घडल्याची नोंद नाही. गावात कोणी अनोळखी व्यक्ती आढळल्यास मारहाण न करता अशा व्यक्तीस पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सतर्कता म्हणून पोलिसांच्या वतीने ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांना बॅटरी व शिटीचे वाटप करण्यात आले आहे.

Web Title: Mavalal Thieves Panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.