"मविआच्या नेत्यांना संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते"; बावनकुळेंनी चढवला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 10:45 IST2024-12-08T10:43:34+5:302024-12-08T10:45:18+5:30
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात असून, मविआच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथविधीवर बहिष्कार टाकला.

"मविआच्या नेत्यांना संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते"; बावनकुळेंनी चढवला हल्ला
Maharashtra News: विधानसभा निवडणुकीनंतर आमदारांच्या शपथविधी आणि विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी विशेष अधिवेशन होत आहे. अधिवेशनात पहिल्या दिवशी आमदारांचा शपथविधी पार पडला. पण, महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएमचा मुद्दा आणि निकालाबद्दल शंका उपस्थित करत शपथविधीवर बहिष्कार टाकला. या भूमिकेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला.
शनिवारी (७ डिसेंबर) विशेष अधिवेशनात १७३ नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. मात्र, महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला.
हा संविधानाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान -बावनकुळे
महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकल्याच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली.
"मविआकडून संविधानाचा अवमान ! राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते, हे त्यांनी आपल्या कालच्या कृतीतून सिद्ध केले", असे ते म्हणाले.
"विधानसभेतील नवनिर्वाचित सदस्यांना संविधानाच्या साक्षीने आमदारकीची शपथ घेणे संविधानिकदृष्ट्या आवश्यक असूनही मविआ सदस्यांनी शपथ घ्यायला नकार दिला. हा संविधानाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. याचा निषेध करावा तेवढे कमीच आहे", अशी टीका बावनकुळे यांनी केली.
शपथविधीसाठी आले आणि नंतर काय घडले?
महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे आमदार शपथविधीसाठी विधिमंडळात आले. सकाळी ११ वाजता आमदार विधानसभेत हजर होते. दरम्यान, शपथ न घेता बाहेर पडण्याचा निरोप आमदारांना कळवण्यात आला.
मारकडवाडीतील ग्रामस्थांना मतदान घेऊ न देण्याचा प्रशासनाचा निर्णय, वाढीव मतदान आणि ईव्हीएमचा मुद्द्या यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेऊ नये असा निरोप आमदारांपर्यंत पोहोचवण्यात आला होता. त्यानंतर आमदारांनी सभात्याग केला.