अत्यावश्यक २१ औषधांच्या कमाल किमती आता ५० टक्क्यांनी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 06:16 AM2019-12-17T06:16:51+5:302019-12-17T06:17:00+5:30
अत्यावश्यक औषधे रुग्णाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावीत यासाठी ‘राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणा’कडून (एनपीपीए) औषधाच्या किमतींवर नियंत्रण आणले जाते. मात्र औषधांमधील मूळ घटकद्रव्ये, उत्पादन किमतींत वाढ झाल्याने औषधांच्या कमाल किमती वाढविण्याची मागणी कंपन्यांनी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २१ अत्यावश्यक औषधांच्या कमाल किमतींत ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने घेतला आहे. यात बीसीजी लस, हिवताप, कुष्ठरोग अशा आजारांवरील औषधांचा समावेश आहे.
अत्यावश्यक औषधे रुग्णाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावीत यासाठी ‘राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणा’कडून (एनपीपीए) औषधाच्या किमतींवर नियंत्रण आणले जाते. मात्र औषधांमधील मूळ घटकद्रव्ये, उत्पादन किमतींत वाढ झाल्याने औषधांच्या कमाल किमती वाढविण्याची मागणी कंपन्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर बाजारात या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून एनपीपीएने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविषयी राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने म्हटले आहे की, ही औषधे प्रथम श्रेणी उपचारांच्या श्रेणीत येतात. ही देशातील लोकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. औषधांची उत्पादन किंमत, मूळ घटकद्रव्यांमध्ये वाढ झाली. त्यामुळे औषधांच्या किमतींमध्येही वाढ व्हावी, अशी मागणी औषधनिर्मिती तसेच औषध विक्रेत्या कंपन्यांनी केली होती. औषध उत्पादन परवड नसल्याने हळूहळू औषधांचा तुटवडा बाजारात निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे आजारांवरील आवश्यक औषधे बाजारात उपलब्ध न होण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
एनपीपीएच्या बैठकांमधून केलेल्या औषधांचा प्रस्ताव नीती आयोगाच्या परवडणारी औषधे आणि आरोग्य उत्पादने या स्थायी समितीकडे पाठविण्यात आला. यावर समितीने औषधांच्या कमाल किमतीमध्ये एकाच वेळेस ५० टक्के वाढ करण्यास मान्यता दिली. त्यानुसार औषध किंमत नियंत्रण आदेश (डीपीसीओ) २०१३ चा संदर्भ देत औषधांच्या कमाल किमतीमध्ये अशा रीतीने एनपीपीएने प्रथमच वाढ केली आहे. या औषधांमध्ये बीसीजी लस, जीवनसत्त्व ड यासह हिवताप, कुष्ठरोग इत्यादी आजारांवरील अत्यावश्यक औषधांचा समावेश आहे.
पुनर्विचार करणे गरजेचे
जन आरोग्य अभियानाचे डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले की, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने सरसकट औषधांच्या किमतींत केलेली वाढ चुकीची आहे. यामुळे रुग्णांची हेळसांड होणार असून आरोग्यसेवेवरही याचा परिणाम होताना दिसेल. त्यामुळे याचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे.