सोशल मीडियाची कमाल, ट्रेनमधील बाळापर्यंत पोहोचवलं दूध
By admin | Published: March 14, 2017 03:12 PM2017-03-14T15:12:22+5:302017-03-14T15:25:23+5:30
सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रांनी केलेल्या प्रयत्नामुळे एका चिमुरडीला दूध मिळालं आणि तिची भूक मिटली
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - सोशल मीडियाचा योग्य वापर आणि प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी वारंवार काळजी घेणा-या रेल्वेचं कौतुक करणारी अजून एक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रांनी केलेल्या प्रयत्नामुळे एका चिमुरडीला दूध मिळालं आणि तिची भूक मिटली. तिरुनेलवेली एक्स्प्रेसमधील ही घटना आहे. एक दांपत्य आपल्या पाच महिन्यांची मुलगी कार्तिकीसोबत प्रवास करत होते. गुजरातहून तिरुनेलवेलीसाठी ते प्रवास करत होते.
कार्तिकीला भूक लागल्याने ती खूप रडत होती. म्हणून तिच्या आईने तिला दूध पाजण्यासाठी बॅगेतील दुधाची बाटली बाहेर काढली. पण दूध खराब झालेलं होतं, त्यामुळे ते पाजणं शक्य नव्हतं. त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. भूक लागली असल्याने कार्तिकी खूप रडत होती. पुढील स्टेशन रत्नागिरी होतं. पण ते येण्यासाठी खूप वेळ होता. ट्रेनमधील कॅन्टीनमध्येही दूध उपलब्ध नव्हतं.
यावेळी त्यांच्यासोबत प्रवास करणा-या प्रवासी नेहा बापटने ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि आपल्या मित्रांकडे मदत मागितली. नेहाच्या मुंबई, पुणे, रत्नागिरी आणि नाशिकमधील मित्रांनी दुधाची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरु केला. फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेकांपर्यत हा संदेश पोहोचला.
रत्नागिरीमधील अनघा निकम आणि प्राजक्ता ओक तर नाशिकच्या रत्ना चावला आणि नितीन पांडे यांनी प्रशासनाला या गोष्टीची माहिती कळवली. दरम्यान अनघा निकमने रेल्वे आणि कोकण रेल्वेला ट्विट करत ही समस्या मांडली. रेल्वेने तात्काल उत्तर दिलं, आणि कोलाड स्थानकावर ट्रेनला थांबवलं. स्थानकावर उपस्थित एका कर्मचा-याने दूधाची पिशवी उपलब्ध करुन दिली. दूध प्यायल्यानंतर अखेर कार्तिकीचं रडणं थांबलं आणि तिच्या आई-वडिलांनीही सुटकेचा निश्वास टाकला. रेल्वेने तात्काळ मदत केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.