राज्यात सर्वाधिक कमाल तापमान मुंबईत, नाशिक १३.८ अंशांसह सर्वांत थंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:49 AM2017-10-30T05:49:49+5:302017-10-30T05:51:59+5:30
वाढत्या उन्हाच्या चटक्यांनी ‘आॅक्टोबर हीट’ने मुंबईकरांचा घाम निघत असून राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान मुंबईत नोंदविण्यात आले. तर सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली आहे.
मुंबई : वाढत्या उन्हाच्या चटक्यांनी ‘आॅक्टोबर हीट’ने मुंबईकरांचा घाम निघत असून राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान मुंबईत नोंदविण्यात आले. तर सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडील नोंदीनुसार, सांताक्रुझ वेधशाळेत ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याच वेळी नाशिकमध्ये मात्र थंडीची लाट दिसून आली असून, तेथे किमान तापमान सर्वांत कमी १३.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. गोव्यासह राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट नोंदवण्यात आली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. २ नोव्हेंबरपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सून परतण्यापूर्वीच ‘आॅक्टोबर हीट’ने मुंबईकरांना घाम फोडला होता. कमाल तापमानातील वाढ, आर्द्रतेमधील वाढ आणि कडक उन्हामुळे मुंबईकर होरपळून निघाले होते. मान्सून मुंबईसह महाराष्ट्रातून हद्दपार झाल्यानंतर यात आणखी वाढ झाली आहे. मुंबईचे कमाल तापमान थेट ३६ अंशावर पोहोचले आहे. परिणामी, कमाल तापमानाच्या वाढत्या आलेखाने मुंबईकर हैराण झाले आहेत.