30 मे रोजी देशातील सर्व मेडिकल राहणार बंद
By admin | Published: May 27, 2017 12:04 PM2017-05-27T12:04:14+5:302017-05-27T12:04:14+5:30
येत्या 30 मे रोजी देशातील सगळे मेडिकल बंद असणार आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27- येत्या 30 मे रोजी देशातील सगळे मेडिकल बंद असणार आहेत. औषधांच्या विक्रिवर सरकारकरून लावण्यात आलेले कडक नियम शिथिल करावे, या मागणीसाठी एक दिवसाचा राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात आला आहे. ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टकडून एक दिवसाचा संप पुकारण्यात आला आहे. पण असोसिएशनच्या या संपाचा फटका मात्र सर्वसामान्य लोकांना जास्त बसणार आहे. 29 मे रोजी रात्री 12 वाजता संपाला सुरूवात होणार आहे.
ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टच्या अंतर्गत एकुण नऊ लाख मेडिकल चालवले जातात. "अनेक वेळा आमच्या तक्रारी सरकारकडे मांडल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही, म्हणूनच आता संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे," असं ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टचं म्हणणं आहे. मेडिकलच्या या राष्ट्रव्यापी संपाची पूर्वसूचना पंतप्रधान कार्यालय, आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय तसंच औषध नियंत्रक कक्षात देण्यात आली आहे. सरकार आपल्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतं असल्याचा आरोप मेडिकल असोसिएशनने सरकारवर केला आहे. 30 मे रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर सरकारच्या विरोधात निदर्शनसुद्धा केली जाणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून औषध विक्रेत्यांकडून त्यांना मिळत असलेलं कमिशन वाढवून मिळण्याची मागणी होते आहे. औषध विक्रेत्यांना सध्या विक्रिवर 16 टक्के कमिशन दिलं जातं आहे. या कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली जाते आहे. सरकार मेडिकलमधल्या सुविधा वाढवायला सांगतं आहे पण नव्या सुविधा देण्यासाठी खर्च जास्त होतो या गोष्टीकडे दुर्लक्ष करतं असल्याचं मेडिकल असोसिएशनकडून सांगितलं जातं आहे.
इतकंच नाही, तर औषधांच्या होणाऱ्या ऑनलाइन विक्रिवरसुद्धा मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेतला आहे. औषध ऑनलाइन विकल्यामुळे मेडिकलचं उत्पन्न घटतं आहे तसंच औषधाचा दुरूपयोग होऊ शकतो आणि औषधांचे दुष्परिणार होण्याची शक्यता जास्त असल्याचं, असोसिएशचं म्हणणं आहे.