मे महिन्यात आकाश नजाऱ्यांची मेजवानी; तीन ग्रहांचे दर्शन, दोन ग्रहांचा अस्त अन्...
By Atul.jaiswal | Published: May 2, 2024 01:12 PM2024-05-02T13:12:59+5:302024-05-02T13:13:14+5:30
मेच्या प्रारंभी सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू हा मेष राशीतुन वृषभ राशीत प्रवेश करेल.
अकोला : दिवसा प्रखरतेने तापणारा सूर्य मावळतीला गेल्यानंतर रात्रीच्या निरव शांततेत आकाश न्याहाळण्याची मजा काही औरच असते. मे महिन्यात निरभ्र आकाशात तीन ग्रहांचे दर्शन, दोन ग्रहाचा अस्त, उल्का वर्षाव, आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आदींची मेजवानी अवकाश प्रेमींसाठी सज्ज राहणार आहे.
मेच्या प्रारंभी सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू हा मेष राशीतुन वृषभ राशीत प्रवेश करेल. आजवर पूर्व क्षितिजावर अधिराज्य गाजवणारा तेजस्वी शूक्राचा अस्त ६मे ला पूर्वेस तर सर्वात मोठा असलेल्या गुरु ग्रहाचा अस्त ७ मे रोजी पश्चिमेस होईल यालाच ग्रामीण भागात चांदणी बुडी असेही म्हटले जाते.
गुरुवार, ४ मे च्या पहाटे वलयांकित शनी ग्रह चंद्राचे वर तर, शुक्रवर ५ मे रोजी लालसर रंगाचा मंगळ ग्रह चंद्राचे अगदी जवळ आणि शनिवार, ६ मे रोजी सर्वात लहान असलेला बुध ग्रह चंद्रकोरी खाली पाहता येईल. एवढेच नव्हे तर ५ मे रोजी पहाटे पूर्व क्षितिजावर कुंभ राशी समुहात दरताशी साठ विविध रंगांच्या उल्का रात्री दोन नंतर पडताना दिसतील.
आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र दर्शन
आपल्या पृथ्वीला सूमारे दीड तासात एक फेरी पूर्ण करणारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मंगळवार ९ मे रोजी रात्री ०७: ५७ ते ०८:०३या वेळी नैॠत्येकडून ईशान्य बाजूस जाताना फिरत्या चांदणी रूपात दिसेल. १० मे रोजी रात्री ०७:०८ ते ०७:१३ या वेळी दक्षिण पूर्व आकाशात, ११ मे रोजी पहाटे ०४:५७ ते ०५:०३ या वेळी वायव्य ते आग्नेय दिशेला तर १३ मे च्या पहाटे ०४:५४ ते ५ वाजता वायव्य ते दक्षिणेकडे जाताना दिसेल.
सावली सोडेल साथ
आपला सूर्य या मे महिन्यात महाराष्ट्र दौऱ्यावर असेल. याची सुरुवात दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत जाईल. बरोबर माध्यान्याचे वेळी सूर्य नेमका डोक्यावर आल्याने आपली सावली काही वेळा पूर्ती नाहीशी झाली असेल. अशी घटना केवळ मकरवृत्त ते कर्कवृत्त या भागात घडून येते. भारतात रांची, भोपाळ झाशी या पट्ट्याच्या दक्षिण भागाकडे ही अनुभूती घेता येईल.
आपल्या जीवनात आनंद भरण्यासाठी विविध छंद सहायक ठरतात. आकाश निरीक्षणाच्या छंदातून आगळावेगळा आनंद घेता येतो. मे महिन्यात आकाशात विविध नजाऱ्यांची मेजवानी मेजवानी असणार आहे. संध्याकाळी हवेतील गारवा आकाशातील विविध गमती-जमती दर्शनार्थ सहायक ठरतो.- प्रभाकर दोड, ज्येष्ठ खगोल अभ्यासक, अकोला