कर्नाटकच्या उद्दामपणाला "मनसे" दणका, बसवर लिहून पाठवलं "जय महाराष्ट्र"
By admin | Published: May 23, 2017 05:12 PM2017-05-23T17:12:31+5:302017-05-23T17:16:03+5:30
"बेळगावसह सीमा भागांत महापालिका, नगरपालिका अथवा विधानसभा सदस्यांना यापुढे "जय महाराष्ट्र" हे शब्द उच्चारण्यावर बंदी घालू " अशी मुजोरीची भाषा
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 23 - "बेळगावसह सीमा भागांत महापालिका, नगरपालिका अथवा विधानसभा सदस्यांना यापुढे "जय महाराष्ट्र" हे शब्द उच्चारण्यावर बंदी घालू " अशी मुजोरीची भाषा कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी वापरली होती. त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया आता महाराष्ट्रात उमटायला सुरूवात झाली आहे. रोशन बेग यांना प्रत्युत्तर म्हणून ठाण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कर्नाटक राज्य परिवहनच्या बसवर ठळक अक्षरांत "जय महाराष्ट्र" लिहून त्या बस कर्नाटकला रवाना केल्या. तर, दादर येथील कर्नाटक संघच्या नावाला आज स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी करणा-या कर्नाटक सरकारने टोकाचं पाऊल उचललं आहे. "जय महाराष्ट्र" ही घोषणा दिल्यास घोषणा देणा-या लोकप्रतिनिधींचं पदच रद्द करण्याचा इशारा कर्नाटक सरकारने दिला आहे. लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र बोलल्यास किंवा कर्नाटकविरोधात घोषणा दिल्यास पद रद्द करण्याचा इशारा नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी दिला आहे.