कल्याण-डोंबिवलीतील नाट्यगृहांच्या दुरवस्थेवरुन महापौर-शहर अभियंत्यांमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 01:03 PM2017-09-26T13:03:39+5:302017-09-26T13:03:49+5:30
ऐन दिवाळीच्या तोंडावर केडीएमसीतील अत्रे आणि सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
अनिकेत घमंडी/ डोंबिवली- ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्याच्या सांस्कृतिक उपराजधानीतील अत्रे आणि सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. सांस्कृतिक केंद्र बंद ठेवण्याची वेळ ही महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ, वेळकाढू आणि दुर्लक्ष करण्याच्या अधिका-यांच्या वृत्तीमुळे आली असल्याचा आरोप महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केला आहे. महापौरांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना यापेक्षा चांगला कुणी शहर अभियंता असेल तर तो आणावा, पालिकेच्या तिजोरीचा खडखडाट जगजाहीर असून आयुक्तांनी आधीच स्पष्ट केले आहे. मला निधी उपलब्ध करुन द्या बाराच काय वीस तास काम करेन, असा टोला शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी यांनी लगावला आहे.
कल्याणमधील अत्रे रंगमंदिराच्या देखभालीचे काम सुरू असून तेथे एसीचे काम हाती घेतले होते. त्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी लागणार होता, पण तो देखील देण्यासाठी महापालिकेची ओंजळ रिकामी असल्याने काय करायचे प्रशासनाने हे महापौरांनी सांगावे, असेही कुलकर्णी म्हणाले. त्यामुळे जो एसीचे काम करणारा ठेकेदार आहे त्याने काम थांबवले आहे. तो रोज तगादा लावत असून त्याला द्यायला पैसेच नाही. महापौर असोत की अन्य सत्ताधारी आहेत त्यांना महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाटाबाबत इत्यंभूत माहिती आहे. मला हे काही वेगळ सांगायला नको, पण तरीही प्रशासनावर खापर फोडायचे हे योग्य नाही. प्रशासन जबाबदारी ढकलत नसून जे आहे ते वास्तव मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्येही एसीचे काम निघाले आहेत. ते काम करण्यासाठीही अत्रे इतक्याच कोट्यवधींच्या निधीची गरज आहे. तो महापौरांनी उपलब्ध करुन द्यावा, आम्हाला काय आम्ही जे 12 तास काम करतोय ते 15 ते 20 तास जोमाने काम करू, असे कुलकर्णी म्हणाले. त्यावर देवळेकर म्हणाले की, वेळच्यावेळी फाईल आणल्या असत्या, मी काय स्थायीने तातडीने मंजुरी दिलीच असती, निदान तर ही वेळ तर आली नसती. पण वेळकाढूपणा करायचा ही नाट्यगृह व्यवस्थापनाची काम करण्याची पद्धत आहे. त्याला लोकप्रतिनिधी दोषी नसून हे अधिकारी जबाबदार असल्याचा पुनर्उच्चार केला.
* ठाण्याच्या गडकरी रंगायतन प्रमाणे या ठिकाणी बाहेरच्या जागेत कॅन्टीन चालवावे. त्यासाठी जो ठेकेदार येइल त्याला स्वच्छता, परिसर देखभाल, यासह चांगले आच्छादन, आकर्षक मांडणी या अटी घालाव्यात. त्यामुळे महापालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होऊ शकते. त्याच नाट्यगृहात खाली बेसमेंटला ४ हजार स्क्वेअर फुटांचा एक मोठा हॉल आहे. मुख्य सभामंडपाला हात न लावता हा बंदिस्त हॉल लग्नसराईसाठी देण्यात यावा, असेही प्रस्ताव आम्ही प्रशासनासमोर ठेवले होते. पण ते बासनात का गुंडाळला, त्याकडे कानाडोळा का, कुणी केला? असा सवाल देवळेकर यांनी केला.
* दरम्यान, लोकमतच्या वृत्ताची दखल घेत महापौर देवळेकरांनी आयुक्त पी. वेलारसू यांच्याशी पत्रव्यवहार करत, चर्चा करणार सांगितले. तर शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी फुले नाट्यगृहाला सकाळी तातडीने भेट दिली. पाहणी करुन दोन दिवसांत निर्णय घेत असल्याचे ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.