महापौरपदी अश्विनी रामाणेच

By admin | Published: November 17, 2015 01:04 AM2015-11-17T01:04:38+5:302015-11-17T01:05:39+5:30

चमत्कार घडलाच नाही : उपमहापौरपदी शमा मुल्ला; ४४ विरुद्ध ३३ मतांनी बाजी; कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अभेद्य

As the mayor of Ashwini Rannik | महापौरपदी अश्विनी रामाणेच

महापौरपदी अश्विनी रामाणेच

Next

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या महापौरपदी कॉँग्रेसच्या अश्विनी अमर रामाणे, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या शमा सलीम मुल्ला यांची सोमवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अपेक्षेप्रमाणे बहुमताने निवड करण्यात आली.
दोन्ही जागा जिंकण्याइतके पुरेशे संख्याबळ नसतानाही आध्यात्मिक शक्ती आणि राजकारणात ‘काहीही घडतं’ या सूत्राच्या जोरावर चमत्काराची भाषा करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची जादू महापौर, उपमहापौर निवडणुकीत निष्फळ ठरली. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिवसेनेनेही भाजपला ‘दे धक्का’ करत चार हात लांबच ठेवले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कसल्याही आमिषाला बळी न पडता राष्ट्रवादीने कॉँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहत मैत्रीचे नाते जपले.
महानगरपालिका निवडणुकीत निर्माण झालेली पक्षीय चुरस, त्यातून मिळालेले काठावरील बहुमत आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत लावलेली फिल्डिंग आणि चमत्कार घडवून आणण्याची केलेली भाषा, यामुळे महापौर-उपमहापौर निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली होती, या निवडणुकीकडे केवळ जिल्ह्याचेच नाही, तर पश्चिम महाराष्ट्राचेही लक्ष लागून राहिले होते; परंतु आकडे बोलके असतात, या न्यायाने कॉँग्रेस व राष्ट्रवादीने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या बाजूने दोन अपक्षांसह ४४ नगरसेवक उभे राहिले, तर भाजप, ताराराणीच्या बाजूने ३३ नगरसेवक उभे राहिले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा महापालिकेच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता सुरू झाली. त्यावेळी सभागृहात कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-ताराराणी आघाडी, असे सरळसरळ विभागले गेले होते.

अकरा मतांचे अधिक्य
महापौरपदासाठी कॉँग्रेसतर्फे अश्विनी अमर रामाणे, भाजपतर्फे सविता शशिकांत भालकर, तर ताराराणी आघाडीतर्फे स्मिता मारुती माने अशा तिघींनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती.
उमेदवारी माघारीसाठी पंधरा मिनिटे देण्यात आली. त्यावेळी स्मिता माने
यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे रामाणे आणि भालकर यांच्यात थेट मुकाबला झाला.
प्रथम सविता भालकर यांच्यासाठी मतदान झाले. त्यावेळी सभागृहातील ३३ नगरसेवकांनी हात वर करून त्यांना
समर्थन दिले. त्यानंतर अश्विनी रामाणे यांच्यासाठी मतदान झाले. तेव्हा त्यांना
४४ नगरसेवकांनी समर्थन दिले.
यावेळी शिवसेनेच्या चार सदस्यांनी कामकाजावरच बहिष्कार टाकला होता. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सैनी यांनी रामाणे या विजयी झाल्याचे घोषित केले.
महापौर निवड झाल्यानंतर लगेचच उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली.
उपमहापौरपदासाठी शमा सलीम मुल्ला (राष्ट्रवादी), राजसिंह भगवानराव शेळके (ताराराणी आघाडी), तर संतोष बाळासाहेब गायकवाड (भाजप) अशा तिघांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते.
माघारीच्या मुदतीत संतोष गायकवाड यांनी माघार घेतली. त्यामुळे शमा मुल्ला व राजसिंह शेळके यांच्यात निवडणूक झाली.
प्रथम शमा मुल्लांसाठी मतदान झाले. तेव्हा ४४ नगरसेवकांनी त्यांना हात वर करून मतदान केले. त्यानंतर राजसिंह शेळके यांना ३३ नगरसेवकांनी मतदान केले.
४सर्वाधिक मते मिळवून मुल्ला विजयी झाल्याचे पिठासीन अधिकारी सैनी यांनी जाहीर केले.

रामाणे बनल्या देशातील सर्वांत तरुण महापौर
कोल्हापूरच्या महापौरपदी निवडून आलेल्या अश्विनी रामाणे या महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सर्वांत तरुण महिला महापौर ठरल्या आहेत. त्यांचे वय सध्या २१ वर्षे ११ महिने दहा दिवस इतके आहे. यापूर्वी नवी मुंबई महापालिकेत माजी मंत्री गणेश नाईक यांचा मुलगा संजीव व त्यानंतर पुतण्या सागर हे वयाच्या २३ व्या वर्षी महापौर झाले होते. कोल्हापूर महापालिकेतच यापूर्वी २०११ ला राष्ट्रवादीच्या कादंबरी कवाळे या वयाच्या २२ व्या वर्षी महापौर झाल्या होत्या.

शिवसेनेचे नगरसेवक तटस्थ
शिवसेनेची चार मते आपल्यालाच मिळतील, तशी बोलणी झाली आहे, असा दावा भाजपने केला होता; परंतु सभागृहात नेमके त्याच्या उलटे घडले. महापौरपदाच्या निवडणुकीवर शिवसेनेच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर अभिजित चव्हाण, राहुल चव्हाण, नियाज खान व प्रतिज्ञा निल्ले-उत्तुरे या नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश केला; परंतु मतदान प्रक्रियेत कसलाही भाग न घेता तटस्थ राहण्याची भूमिका शिवसेनेने घेतली. आधी बहिष्कार नंतर सभागृहाच्या कामकाजात सहभाग आणि परत मतदानापासून अलिप्त अशी गोंधळलेली अवस्था शिवसेनेची दिसून आली.

कोल्हापूरच्या जनतेने निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला पसंती दिली. त्याचा वापर विकासासाठी करणार आहे. महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले; पण विरोधकांनी प्रतिसाद दिला नाही.
- सतेज पाटील, माजी गृहराज्यमंत्री

एकीकडे महापौरपदासह सर्व पदे देण्याचा प्रस्ताव व दुसरीकडे पक्षाची विश्वासार्र्हता, अशी दोलायमान अवस्था झाली होती, अशा स्थितीत विश्वासाहर्तेला महत्त्व दिले. निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी उद्यापासूनच महापौर व उपमहापौर कामाला लागतील.
- हसन मुश्रीफ, आमदार

शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉँगे्रस व शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आवाहन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने ७२ तासांपूर्वी आपण विरोधी बाकावर बसण्याचे जाहीर केले होते. यापुढे सत्ताधाऱ्यांना चांगल्या कामासाठी नेहमीच पाठिंबा आणि चुकीच्या कामांसाठी नेहमीच विरोध राहील.
- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री

कॉँग्रेसचा महापौर झाल्याचा आपल्याला कॉँग्रेसचा आमदार या नात्याने अभिमान आहे. त्यामुळे मी आनंददायी आहे. नूतन महापौरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा असून, त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन सर्वांची कामे करावीत, ही अपेक्षा आहे. कॉँग्रेसचा आमदार म्हणून आपण लागेल ती मदत महापौरांना करू.
- महादेवराव महाडिक, आमदार

Web Title: As the mayor of Ashwini Rannik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.