स्मारक हवे की महापौर बंगला?
By admin | Published: November 18, 2015 03:11 AM2015-11-18T03:11:50+5:302015-11-18T03:11:50+5:30
दादर येथील महापौर निवासाची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अत्यंत अयोग्य असून येथे स्मारक बनवू नये, अशी भूमिका घेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे
मुंबई : दादर येथील महापौर निवासाची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अत्यंत अयोग्य असून येथे स्मारक बनवू नये, अशी भूमिका घेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला लाटण्याचा हा प्रकार असल्याचा थेट आरोपच राज यांनी तातडीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केला.
मंगळवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी महापौर निवासाच्या जागी बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली. त्यानंतर राज यांनी महापौर निवासातील प्रस्तावित स्मारकाला तीव्र विरोध दर्शविला. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईत अनेक पर्याय असताना शिवसेना विनाकारण वाद निर्माण करत असल्याची टीका राज यांनी केली. बाळासाहेबांचे स्मारक भव्यच व्हायला हवे. त्यासाठी महापौरांचे निवासस्थान अयोग्य ठिकाण आहे. महापालिकेत, राज्यात आणि केंद्रातही यांची सत्ता असताना यांना चांगली जागा का मिळत नाही? बिल्डरांना व राजकारण्यांना आरक्षित भूखंड दिले जातात. मग बाळासाहेबांसाठीच का जागा मिळत नाही, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
आज सत्ता आहे म्हणून महापौर निवासात स्मारक बांधत आहात, उद्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात किंवा राष्ट्रपती भवनात स्मारके उभारणार का? महापौर निवास हा मुंबईच्या प्रथम नागरिकासाठी आहे. येथे स्मारक झाल्यावर त्याला काय नाव देणार, महापौर बंगला की स्मारक, अशा प्रश्नांची सरबत्तीच राज यांनी केली.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईत अनेक पर्याय असताना वाद घातला जात आहे. दादरमध्येच म्युन्सिपल क्लबची मोठी जागा आहे. तेथे बाळासाहेबांचे स्मारक व्हावे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महापौर बंगल्यात होणाऱ्या स्मारकाला विरोध करणार असल्याचे राज यांनी सांगितले.