महापौर उवाच्च... माझ्यामुळे वाढतो वृत्तपत्रांचा खप!
By admin | Published: April 6, 2016 10:38 AM2016-04-06T10:38:51+5:302016-04-06T12:13:21+5:30
माझ्यामुळेच वृत्तपत्रांचा खप वाढतो अशी मुक्ताफळे मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेेकर यांनी उधळली.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - प्रसारमाध्यमांमुळे डेंग्यू वाढतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींची शासनपद्धती मला हिटलरशाहीसारखं वाटते अशी वादग्रस्त वक्तव्य करणा-या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेेकर यांनी वक्तव्यांची मालिका कायम ठेवली असून ' माझ्यामुळेच वृत्तपत्र खपतात' अशी नवी मुक्ताफळे उधळली आहेत. मंगळवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दरम्यान आंबेकर यांनी असे वक्तव्य करत शिवसेनेला पुन्हा एकदा अडचणीत आणले. त्यांच्या या बेताल वक्तव्यानंतर विरोधकांनी खिल्ली उडवायला सुरुवात केली, मात्र शिवसेनेचा एकही सदस्य त्यांच्या मदतीसाठी धावला नाही.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक पार पडली, त्यावेळी महापौर स्नेहल आंबेकर पीठासीन अधिकारी होत्या. निवडणुकीपूर्वीच उमेदवारीचा अर्ज मागे घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता, सर्वत्र शांतता असताना विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी महापौरांना कोपरखळी मारत काही बोलण्याचा आग्रह केला. ' स्थायी समितीत महापौर आल्या आहेत, पण त्या गप्प आहेत, काहीच बोलत नाहीत. त्या बोलल्या तर तात्काळ बातम्या होतात,' असा टोला छेडा यांनी हाणला असतात सभागृहात खसखस पिकली. त्यांना प्रत्युत्तर देण्यापासून स्नेहल आंबेकरंना स्वत:ला आवरता आले नाही आणि त्यांनी हसत हसतच ' हो, मी बोलले की वृत्तपत्रांची विक्री वाढते' असे विधान केले. त्यांच्या या विधानानेही सभागृहात हशा पिकला खरा मात्र त्यांच्या उत्तरामुळे शिवसेनेचे नगरसेवक गांगरले, अवाक् झाले. आपल्या विधानाचा मतितार्थ लक्षात आल्यानंतर आंबेकर यांनीही पुढे काहीही बोलणे टाळले.