महापौर, सभापती येणार कायद्याच्या कचाट्यात
By Admin | Published: January 13, 2017 10:20 PM2017-01-13T22:20:23+5:302017-01-13T22:20:23+5:30
महापालिकेच्या सिध्दार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयातील समृध्दी वाघिणीला झालेल्या बछड्यांचे बारसे महापौर भगवान घडामोडे आणि सभापती मोहन मेघावाले यांना चांगलेच
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 13 - महापालिकेच्या सिध्दार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयातील समृध्दी वाघिणीला झालेल्या बछड्यांचे बारसे महापौर भगवान घडामोडे आणि सभापती मोहन मेघावाले यांना चांगलेच भोवणार आहे.‘टीझिंग आॅफ झु अॅनिमल’ नुसार प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना हाताळणे, त्यांना पळविणे, डिवचणे, त्रास देणे हे बेकायदेशीर असून दोन्ही पदधिका-यांवर कारवाईची शक्यता आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने संग्रहालयातील प्राण्यांसाठी तयार केलेल्या कायद्यांचा महापौर आणि सभापतींनी भंग केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.
गुरूवारी प्राणीसंग्रहालयातील अडीच महिन्यांच्या वाघिणींच्या बछड्यांचे वीर, शक्ती आणि भक्ती असे नामकरण करण्यात आल्यानंतर महापौर घडामोडे आणि सभापती मेघावाले यांनी त्यांना कायदा मोडून कुरवाळल्याचे वृत्त लोकमतने १३ जानेवारीच्या अंकांत प्रकाशित करताच पालिका प्रशासन आणि सत्ताधाºयांमध्ये एक च खळबळ उडाली. तर प्राणीमित्रांतून या घटनेप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पालिकेचे प्राणीसंग्रहालय असुरक्षित आहे. गेल्यावर्षी बिबटे आणि वाघिणीचे बछडे दगावण्याच्या दोन घटना संसर्गामुळे घडल्या. असे असतानाही पदाधिकाºयांनी सावधिगिरी बाळण्याऐवजी ते संग्रहालय स्वत:च्या मालकीचे असल्याप्रमाणे वागत आहेत. सभापती मेघावाले यांनी मायेच्या भावनेतून बछड्याला कुरवाळल्याची प्रतिक्रिया दिली. याप्रकरणी महापौर घडामोडे म्हणाले, आमची भावना फोटोसेशन करण्याची नव्हती.
आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सकाळीच प्रभारी प्राणीसंग्रहालय संचालक विजय पाटील व कर्मचाºयांची तातडीने बैठक घेऊन सर्व घटनाक्रम समजून घेतला. तसेच वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संग्रहालयातील प्राण्यांबाबतची केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने तयार नियमावली व त्यातील तरतूदींचे अवलोकन करण्याचे आदेश दिले. कायद्यानुसार जे दोषी असतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रक्रिया पालिका पूर्ण करणार आहे.
कायद्यानुसार कारवाई करू
मनपा आयुक्त म्हणाले, मी प्राणीसंग्रहालय संचालकांना सांगितले आहे, वन्यजीव संरक्षण कायद्यामधील तरतुदीत काय आहे, त्यानुसार कारवाई करु. मनपाचे कर्मचारी असतील किंवा पदाधिकारी असतील, जे कुणी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. झु अॅथॉरिटीच्या संबंधितांना सांगितले आहे. प्राणीसंग्रहालय संचालकांना देखील कायद्याबाबत माहिती घेण्यास सांगितले आहे. येथून मागे दोन घटनांमध्ये बछडे दगावले आहेत. त्यामुळे यावेळी पूर्ण काळजी घेतली, १५ दिवस त्या बछड्यांना बाहेर देखील येऊ दिलेले नाही.
तज्ज्ञ काय म्हणतात...
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने याप्रकरणी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. वाघांच्या बछड्यांना संसर्ग होऊ नये. तसेच त्यांचे वाढत्या वयानुसार हेल्थकार्ड तयार करणे. त्यांना वारंवार होणा-या आजारांची नोंद ठेवणे. त्यांची प्रकृती सदृढ असणे गरजेचे असते. तसेच संसर्ग झाल्यास त्यामागे असलेल्या कारणांची माहिती हेल्थकार्डमध्ये नोंदवावी लागते. पालिकेच्या प्राणीसंग्रहालयाचे जुने रेकॉर्ड चांगले आहे. परंतु अलीकडे वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अधिपत्याखाली असलेल्यास प्राण्यांची हेळसांड वाढली आहे. असे सेवानिवृत्त वनविभागाचे अधिकारी राजेंद्र धोंगडे यांनी सांगितले. बछड्यांसोबतच्या फोटोसेशन प्रकरणात ते म्हणाले, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण याप्रकरणी पालिकेला खुलासा मागविल. बछड्यांना अतिउल्हासाने पदाधिकाºयांनी हाताळले असले तरी हा मुद्दा वन्यजीव संरक्षक कायद्याच्या ‘टीझिंग आॅफ झु अॅनिमल’ अंतर्गत येतो. सर्वंकष तपासाअंती सर्व मुद्दे समोर आल्यावर दंड आणि शिक्षा अशी तरतूद केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमावलीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बछड्यांना संसर्ग झाल्यास काय
गेल्यावर्षी संसर्ग होऊन बिबट्या आणि वाघिणीची बछडे दगावली. मनपाच्या प्राणीसंग्रहालयातील वीर,शक्ती, भक्ती यांना संसर्ग होऊन एखादी दुर्देवी घटना घडल्यास प्राणीसंग्रहालयाची मान्यता देखील रद्द होऊ शकते. त्यामुळे बछड्यांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांना संसर्ग होणार नाही याकडे प्राणीसंग्रहालयाचे लक्ष असणे गरजेचे आहे. पदाधिकाºयांनी त्यांना कुरवाळणे हे चुकीचे आहे. यापुढे कुणीही येईल आणि सत्तेचा धाक दाखवून वनप्राण्यांना हाताळण्याचा हट्ट धरील. पालिकेने कायद्याचे काटेकोर पालन करणे अपेक्षित असल्याचे मत वन्यजीव अभ्यासक किशोर पाठक यांनी व्यक्त केले.