महापौरांची बीआरटीवरून महापालिकेत पुरेवाट
By admin | Published: May 20, 2016 01:40 AM2016-05-20T01:40:31+5:302016-05-20T01:40:31+5:30
महापालिका सर्वसाधारण सभेत सलग दुसऱ्या दिवशी नगर रस्ता बीआरटी मार्गावरून आरोपप्रत्यारोपांचे वादळ उठले.
पुणे : महापालिका सर्वसाधारण सभेत सलग दुसऱ्या दिवशी नगर रस्ता बीआरटी मार्गावरून आरोपप्रत्यारोपांचे वादळ उठले. सत्ताधारी राष्ट्रवादीवर सेना, भाजपा, काँग्रेस यांचे सदस्य तुटून पडले. त्यांना उत्तर देताना महापौर प्रशांत जगताप यांची पुरेवाट झाली. अखेरीस या रस्त्यावर पादचारी सुरक्षेसाठी पूल किंवा अन्य कोणते उपाय करता येतील याचा प्रस्ताव प्रशासन सोमवारी (दि.२२) सर्वसाधारण सभेत सादर करेल, असे आश्वासन त्यांना सभागृहाला द्यावे लागले.
नगर रस्ता बीआरटी सुरू झाल्यापासून तिथे अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. बुधवारी सर्वसाधारण सभेत काँग्रेस, सेना, भाजपा यांनी आंदोलन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर महापौर जगताप यांच्या आदेशावरून रात्री आयुक्त कुणाल कुमार यांनी बीआरटीशी संबंधित सर्वांची संयुक्त बैठक घेतली. त्यात अनेक निर्णय झाले. गुरुवारी सकाळी या मार्गावर पुन्हा अपघात झाला. त्यामुळे दुपारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची धार धरली.
नगरसेवक योगेश मुळीक, शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, संजय भोसले यांनी बीआरटी मार्गाचे संपूर्ण काम होत नाही तोपर्यंत हा मार्ग बंद करावा, अशी मागणी केली. वाहतूक पोलीस नाहीत, रस्ता ओलांडण्यासाठी पांढरे पट्टे मारलेले नाहीत, पादचाऱ्यांच्या सुरक्षेची कसलीच काळजी घेण्यात आलेली नाही. ही महत्त्वाची कामे अपूर्ण असताना मार्ग सुरू तरी कशाला केला, असा सवाल त्यांनी महापौरांना विचारला. अन्य नगरसेवकांनीही यावरून प्रशासनावर टीका केली.
(प्रतिनिधी)
>सोमवारच्या सभेत अहवाल
पादचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाचीच आहे, ती वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे महापौर जगताप म्हणाले. काही ठिकाणी पादचारी पूल बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. शास्त्रीनगर, रामवाडी, विमाननगर, चंदननगर, याचा त्यात समावेश आहे. प्रशासन याचा अभ्यास करीत असून, याबाबत सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अहवाल ठेवण्यात येईल, असे महापौरांनी सभागृहाला सांगितले. त्यानंतर सदस्य शांत होऊन पुढील विषयांना सुरुवात झाली.